ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 23 - जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे आणि मोठी वाहतूक असलेले पूल नादुरुस्त आहेत. यामध्ये मंगरुळपीर येथील अरूणावती नदीवरच्या पुलाचा समावेश आहे. जीर्ण झालेल्या या पुलावरून दिवसाला शेकडो वाहने धावत असतात. अशात एखादवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंगरुळपीर येथील अरुणावती नदीचे उन्हाळ्यातच लोकसहभागातून खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. याचा चांगला परिणाम पाहायला मिळत असून, पावसाळा संपण्यापूर्वीच कोरड्या होणाºया या नदीच्या पात्रात आता सात ते आठ फुट खोल पाणी सतत वाहताना दिसते. या नदीवर मंगरुळपीर आणि मानोरा मार्गावर जवळपास शतकभरापूर्वी एक पूल बांधण्यात आला आहे. या पुलासवरून अकोला, दिग्रस, यवतमाळ, पुसद अशा मोठ्या शहरांसाठी सतत बसगाड्या, ट्रक आणि इतर वाहनांची वाहतूक सुरू असते. हा पूल जीर्ण झाला आहे. या पुलाचे कठडे तुटून हा पुल अगदी मोकळा झाला आहे. त्याशिवास पुलाचे नदीपात्रातील खांब खोलवर उघडे पडले आहेत. त्यामुळे एखादवेळी पाण्याचा प्रवाह वाढून हा पुल तुटण्याची शक्यता आहे. अशावेळी पुलावरून एखादे मोठे प्रवासी वाहन धावत असल्यास मोठा अपघात घडून जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यायला हवी.