ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १ - दुष्टांचे निर्दालन करुन आपल्या भक्तांचे रक्षण व पालन करणा-या आदिशक्ती आराधनेच्या शारदीय नवरात्रौत्सवाला शनिवारपासून थाटात प्रारंभ झाली.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईची पहिल्या माळेला सिंहासनाधिष्ठीत अंबाबाई रुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. पंचामृत अभिषेक, तोफेची सलामी, घटस्थापना, आरती, पालखी पूजन, मंत्रोच्चार अशा धार्मिक व मंगलमयी वातावरणाने कोल्हापूरकर अंबेच्या भक्तीरसात न्हाऊन निघाले.
करवीर निवासिनी अंबाबाई आदिशक्ती स्वरुपिनी असल्याने तिचा नवरात्रौत्सव म्हणजे देश्भरातील भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेनिमित्त पहाटे पावणे पाच वाजल्यापासून देवीचे दर्शन सुरु करण्यात आले. सकाळी साडे आठ वाजता तोफेच्या सलामीनंतर मुळ घराणे श्रीपूजक शेखर मुनिश्वर यांच्या हस्ते मंदिरात घटस्थापन करण्यात आली.
त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी सपत्नीक अंबाबाईचा पहिला अभिषेक केला. त्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. प्रदिप देशपांडे, श्रीमंत मालोजीराजे, भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडीक, माजी खासदार निवेदिता माने, राजलक्ष्मी खानविलकर यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
दुपारची आरती झाल्यानंतर अंबाबाईची सिंहासहानाधिष्ठीत अंबाबाई रुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. यादिवशी घटस्थापना, अखंड नंदादीप, पुष्पमालाबंधन, चंडीपाठ होवून देवी उपासना व कुळाचाराला व नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत असल्याने देवीची बैठी पूजा बांधली जाते.
या दिवसापासून महानवमीपर्यंत देवी भक्तांच्या उपासना स्विकारत सुखाने सिंहासनावर विराजमान होते आणि भक्तांना आशिर्वाद देते हे या पूजेमधून दर्शवण्यात आले. ही पूजा दिवाकर ठाणेकर, आशुतोष ठाणेकर, सचिन ठाणेकर, मिलींद दिवाण व प्रसाद लाटकर यांनी बांधली.
मंदिरात दिवसभरात विश्वकर्मा महिला सोंगी भजनी मंडळ, राधा महिला भजनी मंडळ, स्वरमाऊली भजनी मंडळ, स्वरानंद संगीत वाद्यवृंद, महालक्ष्मी भजनी मंडळ, शिवशाहू पोवाडा मंच या संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रात्री साडे नऊ वाजता देवीची पालखी काढण्यात आली. महापौर अश्विनी रामाणे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनीपालखीचे पूजन केले. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला.
अखंड नंदादीप, पुष्पमालाबंधन, चंडीपाठ, देवी उपासनेने आदिशक्ती आराधनेच्या शारदीय नवराञौत्सवाला प्रारंभ झाला. उत्सवाच्या पहिल्या माळेला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापूरातील करवीर निवासिनी अंबाबाईची सिंहासनाधिष्ठीत अंबाबाई रूपात पूजा बांधण्यात आली.