ऑनलाइन लोकमत
गगनबावडा, दि.30 - निसर्गसौंदर्याने बहरलेल्या, सह्याद्रीच्या कडेकपारीत वाड्यावस्तींसह विस्तारलेल्या गगनबावड्यात भर उन्हाळ्याच्या वातावरणातही पसरलेली धुक्यांची दुलई पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे. कोकणशी थेट हृदयाचे नाते जोडणारा गगनबावडा परिसरात विपुल जैवविविधता व बाराही महिने पर्यटकांना गारवा देणारे वातावरण, तसेच अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे येणा-या पर्यटकांसाठी थंड हवेचे हे ठिकाण मिनी महाबळेश्वर म्हणूनच भावते आहे.
कोल्हापूर शहरापासून गगनबावडा अवघा ५५ किलोमीटर अंतरावर आहे. ४६ वाड्यावस्तींसह येथे अनेक पुरातन व ऐतिहासिक स्थळे आहेत. मिनी महाबळेश्वर म्हणून उदयास येत असलेल्या गगनबावडा येथे रिसॉर्टसह उन्हाळ्यात रानमेव्यांची सरबराई मन खेचून घेते. विविध जातींच्या वनप्राण्यांसह करूळ व भुईबावडा घाटातील कोकण पॉर्इंट, वळणाचे रस्ते, खोल द-या पाहून पर्यटक मोहून जात आहेत. तालुक्यातील बोरबेट येथील विस्तीर्ण पठार, तेथील आकर्षक मोरजाई मंदिर, गुहा, नजीकचा कलकसांडे प्रकल्प, साखरी-तिसंगी येथील तामजाई मंदिर, तळगे बुद्रुक येथील वळताई देवीचे अधिष्ठान, मुटकेश्वर येथील मुक्तेश्वर मंदिर व तेथील पुरातन वारुळ पाहण्यासारखे आहे. तसेच पळसंबे येथील पंत अमात्य बावडेकर सरकारांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा वाडाही पहायला मिळतो.