ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 28 - एकेकाळी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या असदगड किल्ल्याची दुर्दशा झाली आहे. गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या या किल्ल्याची भिंत ढासळली असून, बुरुजही कमकुवत झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेमुळे एकेकाळी अभेद्यपणे उभा असलेला हा किल्ला आता शेवटच्या घटका मोजत आहे. अकोलसिंग नावाच्या राजपूत सरदाराच्या नावावरून अकोला हे नाव पडले आहे. अकोलसिंग राजाने अकोला गावाच्या सुरक्षेसाठी संरक्षक भींत बांधली होती. त्यानंतर औरंगजेबाच्या काळात त्याचा सरदार असद खान याने मोर्णा नदीच्या काठावर १६९७ मध्ये येथे किल्ला बांधला. त्याच्या नावावरून हा किल्ला असदगड म्हणून ओळखला जातो. काळाच्या ओघात या किल्ल्याचे महत्व कमी होत गेले. आता या किल्ल्याची पार दुरवस्था झाली आहे. किल्ल्यावर आझाद पार्क उभारण्यात आला आहे. परंतु या पार्ककडे स्थानिक प्रशासनाचे फारसे लक्ष नाही. किल्ल्याची पश्चिमेकडील भींत कोसळली आहे. किल्ल्याला लागूनच मोर्णा नदी वाहते. किल्ल्याभोवती काटेरी झुडपे वाढली आहेत. किल्ल्यावरही अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. अकोल्याची गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आता दुरवस्थेत आहे. किल्ल्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. किल्ल्याची डागडुजी करून संरक्षक भींत बांधण्याची दुर्गप्रेमी नागरिकांची मागणी आहे. किल्ल्याकडे लक्ष न दिल्यास हा हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही
VIDEO- अकोल्याचा असदगड मोजतोय शेवटच्या घटका
By admin | Published: October 28, 2016 8:26 PM