ऑनलाइन लोकमत
सलगरा, दि. १४ - शालेय पोषण आहाराअंतर्गतच्या वरण-भातातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास लातूर तालुक्यातील सलगरा येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. विद्यार्थ्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
लातूर शहरापासून २२ कि.मी. अंतरावर सलगरा (बु.) गाव आहे. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. शाळेतील पटसंख्या १९९ असून, शुक्रवारी १८० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी वर्ग भरले. दुपारी १.१५ वाजता दीर्घ मध्यांतर झाल्याने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत वरण-भात देण्यात आला.
शाळेतील तीन शिक्षकांनी या अन्नाची चव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना वरण-भाताचे वाटप सुरू झाले. काही विद्यार्थ्यांनी हे अन्न खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने मळमळ होण्यास सुरुवात झाली. त्यातील काही विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. दरम्यान, ही माहिती गावातील नागरिकांना समजल्याने त्यांनी शाळेकडे धाव घेतली. मळमळ, उलटीचा त्रास जाणवणाºया ८० विद्यार्थ्यांना तात्काळ लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर...
सलगराशाळेतील विद्यार्थ्यांना वरण-भात देण्यात आला होता. सर्व मुलांचे जेवण झाले होते. शेवटी शिक्षकांसमवेत एकजण जेवण करीत होता. त्याच्या ताटात पाल आढळून आली. त्यामुळे गोंधळ उडाला. या सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्हीही तिथेच आहोत, असे लातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी सांगितले.
आम्ही चव घेतली होती...
विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यापूर्वी शाळेतील तीन शिक्षकांनी अन्नाची चव घेतली होती. एका मुलाच्या ताटात पाल आढळल्यानंतर आम्ही तात्काळ भोजन वाटप बंद केले. दरम्यान, शाळेत एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना उपचारासाठी लातूरला दाखल केले आहे, असे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक के.बी. जाधव यांनी सांगितले.
रुग्णालयात गर्दी...
सलग-यातील विद्यार्थ्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने रुग्णालय परिसरात पालकांनी एकच गर्दी केली होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांची धावपळ सुरू होती. रुग्णालयातील एका मोठ्या हॉलमध्ये या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.