विवेक चांदूरकर, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. २४ - बुलडाण्याचे मांडे म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मातीच्या चुलीवर मातीच्या मडक्यावरील मांडे बनविण्याची विशेष पद्धती असून, त्याची चवही वेगळी आहे. त्यामुळे बुलडाण्यातील मांडे खव्वयांच्या पसंतीस उतरले असून, मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे अनेक महिलांना व्यवसायही मिळाला आहे. शहरातील खामगाव मार्गावर रस्त्यालगत काही महिन्यांपूर्वी दोन महिलांनी मांडे बनविण्याच्या चुली थाटल्या व मांडे विकण्याला सुरूवात केली. दिवसेंदिवस मांड्यांना मागणी वाढत असल्यामुळे आता या ठिकाणी दहा ते बारा महिला मांडे विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. मातीच्या चुलीवर मातीचे मडके अर्धवट काप देवून ठेवण्यात येते. त्यानंतर गव्हाच्या कनीकीची हातावर पातळ अशी चपाती बनविण्यात येते. (ही पोळी साधारण चपातीच्या चार पट मोठी असते) त्यानंतर चपाती मडक्यावर टाकून भाजण्यात येते. चपाती भाजल्यानंतर तिला
खाली उतरवून ‘दवळी’मध्ये ठेवण्यात येते. बांबूच्या बारीक तुकड्यांपासून बनविलेली दवळीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळे मांडे कितीही वेळानंतर कडक होत नाहीत. चिखली चौकात मांडे मिळत असल्याची वार्ता आता पंचक्रोशित पसरली आहे. त्यामुळे दररोज सायंकाळी या ठिकाणी ग्राहक येतात व मांडे घेवून जातात. एका मांड्याची किमत १० रुपये आहे.
या व्यवसायामुळे महिलांनाही रोजगार मिळाला आहे. दहा ते बारा दुकानांवर जवळपास ५० महिला काम करतात. त्यांना दिवसाला २०० ते ३०० रूपये उत्पन्न मिळते. मटनासोबतच मांडे खाण्याला जास्त पसंती दिल्या जाते. त्यामुळे बुधवार, शुक्रवार व रविवारी मांड्यांची विक्री दुपटीने होते.