ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 7 - हिवाळा हा ऋतू सर्वार्थाने आरोग्यासाठी हितकारक असल्यामुळे या मोसमात आरोग्य सुधारण्यासाठी आहार-विहारासह व्यायामास प्राधान्य दिले जाते. हिवाळा सुरू होताच पहाटे फिरावयास जाणाऱ्यांची संख्या वाढत असून, अकोला शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पीडीकेव्ही) परिसरात दररोज पहाटे अकोलेकर मोठ्या संख्येने 'मॉर्निंग वॉक' करताना दिसून येत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने 'मॉर्निंग वॉक'साठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. डॉ. पंदेकृविचा परिसरात म्हणजे अकोला शहराचे 'आॅक्सिजन गृह'. या परिसरात शहरातील 'हेल्थ कॉन्शियस' मंडळी बाराही महिने पहाटे फिरावयास जातात. या परिसरात पहाटे फेरफटका मारल्याने संपूर्ण दिवस ताजेतवाने वाटते. आता हिवाळा सुरू झाल्यामुळे व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.फिरण्यासारखा दुसरा व्यायाम नसल्यामुळे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने पीडीकेव्ही परिसरात 'मॉर्निंग वॉक'साठी येतात. यामध्ये महिला, पुरुष, तरुण मुले-मुली व वृद्धांचाही समावेश असतो. दररोज शेकडो अकोलेकर पहाटे फिरावयास येत असल्यामुळे हा परिसर गजबजलेला दिसून येतो.
VIDEO- उत्तम आरोग्यासाठी करा 'मॉर्निंग वॉक'
By admin | Published: November 07, 2016 8:35 PM