ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. २६ - जागतिक स्त्री समानतादिनानिमित्त येथील किडझी संस्कार ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांनी साडी परिधान करुन रॅली काढत स्त्री समानतेचा संदेश दिला. स्त्रीयांना सर्वप्रथम मतदानाचा अधिकार २६ आॅगस्ट १९२० रोजी मिळाला. खºया अर्थाने स्त्रियांना प्रशासकीय व संसदीय कार्यक्षेत्रात सहभागाची संधी या दिवसापासून मिळाल्याने २६ आॅगस्ट हा जागतिक स्तरावर ‘स्त्री समानता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्या साधून स्त्री समानतेचा संदेश देण्यासाठी येथील किडझी संस्कार ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांनी अनोखी रॅली काढली. स्त्री समानतेचा संदेश रुजावा यासाठी इयत्ता पहिलीच्या मुलांनी साडी परिधान करुन प्रत्येक वर्गात तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना विविध घोषवाक्याच्या आधारे स्त्री समानतेचे महत्व सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना ज्ञानपीठचे प्राचार्य प्रशांत धर्माधिकारी यांनी स्त्री समानता दिनाची संपूर्ण पृष्ठभूमी विद्यार्थ्यांना विषद केली. स्त्री समानतेचा कायदा येण्यासाठी अमेरिकेसारख्या देशात ९३ वर्षांची लढाई स्त्रीयांना तसेच कायदेतज्ज्ञांनी लढावी लागली. यानंतर २६ आॅगस्ट १९७८ रोजी अमेरिकन संसदेत स्त्री समानतेचा कायदा पारित झाला, अशी माहिती प्राचार्यांनी दिली. या रॅलीमध्ये सरिता गांधी, स्वप्ना चव्हाण, वंदना ढगे, आशा खोकले यांच्यासह सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या ह्या अभिनव उपक्रमाचे शाळेचे संचालक अमित कीर्तन यांनी कौतुक केले.