संतोष वानखडे
वाशिम, दि. १६ - ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ, बेटी है कुदरत का अधिकार, जीने का उसको दो अधिकार, बेटी को मत समझो भार, जीवन का है वो आधार’ असा संदेश देत ‘रोबोट’च्या भूमिकेत असलेल्या एका शिक्षकाने सोमवारी स्वातंत्र्य दिनी ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा जागर केला. मुलींनाही जगण्याचा अधिकार द्या आणि स्त्री भ्रूण हत्या करू नका’ अशा घोषणा देत मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले.
स्त्रि-पुरूष लिंग गुणोत्तर प्रमाणातील दरी कमी करणे आणि मुलींना शिक्षण व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या जनजागृतीचा एक भाग म्हणून स्वातंत्रदिनी वाशिम येथे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात शिक्षक गोपाल खाडे यांनी ‘रोबोट’च्या भूमिकेत महिलांची महती विषद करून स्त्री जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले. मुली आणि महिलांनी आता सर्वच क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. बदलत्या जगाचा वेध घेत त्यांनी आपला स्वतंत्र ठसा चौफेर उठवला आहे. दहावी-बारावीचा निकाल असो किंवा विविध स्पर्धा परीक्षांतही मुलींच्या यशाचे प्रमाण उल्लेखनीय आहे. तेव्हा मुलांनाच वंशाचा दिवा न मानता मुलगीही वंशाचा दिवा होऊ शकते, हे खाडे यांनी उपस्थितांना पटवून दिले. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनात व महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांच्या पुढाकारात खाडे यांनी हा उपक्रम राबविला.