ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ९ - जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा प्रशासन व टिळक गणेशोत्सव मंडळ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे रोबोटद्वारे ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संदेश देण्यात आला.
स्त्रि-पुरूष लिंग गुणोत्तर प्रमाणातील दरी कमी करणे आणि मुलींना शिक्षण व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या जनजागृतीचा एक भाग म्हणून विविध उपक्रम सादर केले जात आहेत. महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा प्रशासनातर्फे गणेशोत्सवादरम्यान ‘लेक वाचवा आणि लेक शिकवा’चा संदेश दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनात आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांच्या पुढाकारात टिळक गणेशोत्सव मंडळ कारंजा यांच्या सहकार्यातून शिक्षक गोपाल खाडे यांनी टिळक गणेशोत्सव मंडळासमोर ‘रोबोट’च्या भूमिकेत जनजागृती केली.
खाडे यांनी ‘रोबोट’च्या भूमिकेत महिलांची महती विषद करून स्त्री जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले. मुली आणि महिलांनी पुरुषांप्रमाणेच सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. बदलत्या काळानुसार स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे मुलगा हाच वंशाचा दिवा या मानसिकतेतून बाहेर पडून मुलगीही वंशाचा दिवा होऊ शकते, याचा विचार प्रत्येकाने करावा, असा संदेश दिला.