ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - आपल्या विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी मुंबईसह अन्य शहरांना या संपाची विशेष झळ जाणवली नव्हती. पण आज मात्र दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. मुंबई, ठाण्याला फळभाज्यांचा पुरवठा करणा-या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गाडयांची आवक घटली आहे. दररोज 500 ट्रक भरुन फळभाज्या एपीएमसी मार्केटमध्ये येतात पण आज फक्त 180 गाडया आल्या. यात 49 ट्रक आणि 131 टेम्पो आहेत. ठाणे आणि कल्याणमध्ये भाजीपाल्याची एकही गाडी आलेली नाही.
दादरमध्ये रोज 200 गाडया भरून भाजीपाला येतो पण आज फक्त 50 ते 60 गाडयांमधून भाजीपाला आला.
वसई-विरारमध्ये दुधाची आवक 30 टक्क्यांनी कमी झाली आहे.
लातूर बाजार समितीतही फक्त 40 टक्के भाज्यांची आवक झाली आहे.
सोलापूरमध्ये पोलीस बंदोबस्त असून देखील पंढरपूर मार्केटमध्ये शुकशुकाट, एक ही शेतकरी भाजीपाला घेवुन आला नाही.
काल संपाच्या पहिल्या दिवशी शेतक-यांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगविण्यासाठी येवल्यात पोलिसांना गोळीबार करावा लागला. तर औरंगाबादेत व्यापाऱ्यांनी शेतकरी नेत्याला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला, तर हजारो लीटर दूध रस्त्यांवर ओतले.
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही संपात सहभागी झाल्याने बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले. रस्तोरस्ती भाजीपाल्याचे ढीग दिसत होते आणि दुधाचे पाट वाहत होते. नाशिक जिल्ह्यामध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकण्यात आल्याने पोलिसांना काही ठिकाणी लाठीमार करावा लागला. त्यामुळे निफाड, नैताळे, लासलगाव, येवला आदी गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर नैताळे रामपूर, गाजरवाडी, सोनेवाडी, श्रीरामनगर येथील शेतकऱ्यांनी सकाळी ८ वाजता डाळिंबी, कांदे, आंबे, बटाटे रस्त्यावर फेकून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. नाशिक, मुंबई व गुजरातकडे जाणारा शेतमाल पूर्णत: बंद केला आहे.