- सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 04 - स्वार्थाने बरबटलेल्या या जमान्यात माणूसच माणसाचा वैरी ठरल्याची अनेक उदाहरणे सभोवताल घडत आहेत. मुक्या पशूप्राण्यांमधील मुक संवेदना मात्र आजही जीवंत असल्याचे दिसून येत आहे. मुक्तपणे खेळत-बागडत असताना माकडाचे एक पिल्लू अचानक रस्त्यावरील खड्डयात पडले. यादरम्यान तेथे असलेल्या अनेक माणसांचा प्रतिकार करित त्या पिल्लाला त्याच्या सवंगड्या माकडांच्या टोळीने ताब्यात घेण्यासाठी अविश्रांत संघर्ष केल्याचे पाहावयास मिळाले.
कारंजा लाड (जि. वाशिम) येथील स्टेट बँकेसमोर मंगळवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. खड्डयात पडलेल्या पिल्लाला एका माणसाने बाहेर काढले. त्या पिल्लाचा ताबा घेण्यासाठी माकडांची भलीमोठी टोळी याठिकाणी जमली. यावेळी तेथे जमलेल्या अनेकांनी या टोळीला दगड अन् काठ्या मारून त्याठिकाणाहून पांगविण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, माणसांच्या या हेटाळणीचा माकडांवर तसूभरही परिणाम झाला नाही. अखेर महत्प्रयासानंतर माकडांच्या टोळीने पिल्लाचा ताबा घेवून सुरू असलेल्या संघर्षाला विराम दिला.