ऑनलाइन लोकमत
वरवट बकाल, (जि.बुलडाणा), दि. 16 - संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे नागरिकांनी प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन केले. येथे स्मशानभूमी नसल्याने ७ सप्टेंबर रोजी देखील प्रेत खांद्यावर घेऊन तहसील कार्यालयावर नेत आंदोलन करण्यात आले होते.
वरवट बकाल येथे स्मशानभूमी नसल्यामुळे नातेवाईकांना ५ किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागते. या ठिकाणी स्मशानभूमी देण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत असून, ७ सप्टेंबर नंतर शुक्रवारी देखील वरवट बकाल येथे प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता वरवट येथील सरस्वताबाई सत्तु इंगळे वय ७० या महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाले.दफनभूमी साठी जागा नसल्याने नातेवाईकांनी स्मशानभूमीच्या जागेसाठी आंदोलन केले. तथापि, ७ आणि ९ सप्टेंबर रोजी असाच पेच निर्माण झाला होता. त्यावेळी गावातील कमल गांधी यांनी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. मात्र, शुक्रवारी स्मशान भूमीच्या जागेचा पेच कायम असल्याने सरस्वताबाई इंगळे यांच्या नातेवाईकांनी आंदोलन केले. दोन्ही आंदोलनाच्यावेळी प्रशासनाने आठ दिवसांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नसल्यामुळे वरवट येथे स्मशानभूमीची समस्या बिकट बनत असल्याचे दिसून येते.
पाहा व्हिडीओ-