मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच शिवजयंतीच्या जल्लोषात सहभागी झाले होते. शिवरायांचे पोवाडे, व्याख्यान असे विविध कार्यक्रम घेतले जात होते. त्यातच शिवजयंतीनिमित्त रायगडमधील मुरुड येथील एका मुस्लीम शाळकरी मुलीचं भाषण सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अवघ्या ५ मिनिटाच्या भाषणात या मुलीने शिवरायांच्या काळात स्त्रीचा कसा सन्मान करण्यात येत होता यावर भाष्य केलं आहे. तिच्या या व्हिडीओचं शिवभक्तांकडून कौतुक केलं जात आहे. या व्हिडिओत ती म्हणते की, स्थळ लालमहल, वेळ-मध्यरात्रीची, निर्धास्तपणे झोपलेला शाहिस्तेखान, अचानक आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वादळापासून वाचवण्यासाठी शाहिस्तेखान पळू लागला, मात्र याच झटापटीत शाहिस्तेखानाची बोटं छाटली गेली. काही वेळाने शिवरायांचे वादळ शांत झालं. त्यानंतर घाबरलेल्या स्थितीत धावत धावत शाहिस्तेखानाची बहिण येते, भाईजान, माझ्या मुलीला शिवाजीने पळवून नेलं असं सांगते त्यावेळी शाहिस्तेखान म्हणतो, शिवाजी कोणाचं मुंडकं कापू शकतो, हात-पाय कापू शकतो पण कोणत्याही मुली-महिलांना पळवून नेणार नाही. शत्रूंनीही विश्वास ठेवावा असा आपल्या शिवरायांचे स्त्रीविषयक धोरक होते असं ती म्हणते.
शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी केलेले नियम, कठोर पाऊल हे स्त्रीमुक्तीसाठी केलेली क्रांती होती. हजारो वर्षापासून प्रथा-परंपरेला धक्का लावण्याचं हिंमत कोणी करु शकलं नाही, पण ते आमच्या राजांनी केलं. तलवार सगळ्यांच्या हातात होती, ताकद सर्वांच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त शिवबांच्या मनात होती अशा शब्दात तिने महाराजांनी स्त्रियांबद्दल उचलेलं धोरण सांगितले.
स्वराज्यात स्त्रियांचा योग्य सन्मान राखला गेला, कोणत्याही महिलेवर अन्याय-अत्याचार करणाऱ्यांची स्वराज्यात कधीच गय केली नाही. ज्याने कोणी असं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथल्या तिथे कठोर शिक्षा केली जात होती. मात्र आताच्या काळात १७ व्या वर्षी बलात्कार झालेल्या मुलीला वयाच्या ७० व्या वर्षीपर्यंत न्यायाची वाट पाहावी लागते, मात्र रांझेपाटलाने एका शेतकऱ्यांच्या मुलीवर अत्याचार केला त्याचे हातपाय छाटण्याची शिक्षा महाराजांनी त्वरीत दिली. त्यामुळे शिवरायांची गरज या महाराष्ट्राला आहे असं या मुलीने सांगितले.
तसेच शिवरायांच्या पहिल्या गुरु मातोश्री जिजाऊंनी न्याय,बुद्धी, महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली. मातोश्रीने सांगितले आपल्याला स्त्री वाचवायची आहे नाचवायची नाही, त्यामुळे महाराजांच्या दरबारात कधीच स्त्री नाचली नाही, परस्त्रीला मातेचा दर्जा महाराजांनी दिला, शत्रूंच्या स्त्रीलाही सन्मान करण्याचा राजा आपला होता. ज्या काळात युद्ध झाल्यानंतर शत्रूंच्या स्त्रियांवर अत्याचार होत असे, एक भेटवस्तू म्हणून स्त्रीला शत्रूंकडे दिलं जात होते. प्रजेचे रक्षक त्यांचे भक्षक बनले होते त्यावेळी महाराजांची स्त्रियांचे रक्षण केले, महाराजांनी कल्याणच्या सूनेला नारळाची ओटी भरुन तिला सन्माने परत पाठवले होते हा इतिहास आहे या तिच्या भाषणाने उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं.