सागर सिरसाट / आॅनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - वळवावी तशी वळते असा लौकीक असलेली आपली मराठी भाषा लिहिण्याची वेळ येते तेव्हा अनेकांची त्रेधा उडते... कोणता शब्द ऱ्हस्व अन् कोणता दिर्घ... कुठे नेमका अनुस्वार... अन्् कुठे ‘न’ कुठे ‘ण’... अशा अनेक धांदल उडवणाऱ्या व्याकरणाने हैराण झालेल्या एका चिमुकल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून हसून हसून लोटपोट व्हायला होतं हे खरंय... पण अखेर आपली मातृभाषा मायमराठी आहे की म-हाटी हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. मराठी लिहिताना ऱ्हस्व दीर्घच्या चुकांना कंटाळून रडणारा एक मुलगा दाखवणारा व्हिडीओ गेले दोन-चार दिवस फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर फिरतोय. हा चिमुकला कुठला ते कळू शकलं नसलं तरी त्यावरून मराठी भाषेबद्दल पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे, हे नक्की.महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीची सरकारच्याच विविध विभागांकडून गळचेपी केली जात असल्याच्या बातम्या नेहमीच ऐकायला येत असतात. निवडणुका आल्या की मराठी भाषेचा जवळपास सर्वच राजकीय नेत्यांना पुळका येतो. आपली मातृभाषा असली तरी मराठीला कधी सुगीचे दिवस येणार याबाबत आपण सातत्याने केवळ गळे काढत असतो. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक चिमुकला मराठीचा अभ्यास करताना दिसतोय, त्याची आई त्याला मराठी शिकवताना दिसतेय. मात्र, तो चिमुकला मराठी भाषेतील काना, मात्रा, अनुस्वार, आदी अर्थातच शुद्धलेखनाला चांगलाच वैतागलेला दिसतोय. मराठीपेक्षा इंग्रजी भारी असं म्हणत मराठी न शिकण्याची एकाहून एक कारणं देताना तो चक्क आई-वडिलांसमोर ढसाढसा रडत हात जोडून विनंतीदेखील करत आहे. व्हिडीओ पाहून एकवेळ या चिमुकल्याचं म्हणणं पटेलही पण त्याचवेळी इंग्रजीच्या स्पेलिंग्ज पाठ करताना आणि करून घेताना घरोघरच्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आणि शिक्षकांची उडणारी त्रेधा आपण विसरतो का? मराठी आपण जन्माला आल्यापासून आपसुकच बोलायला लागतो त्यामुळे शुद्धलेखन शिकण्याचा प्रश्नच येत नाही. इंग्रजी शिकताना असं नसतं. ती शिकावीच लागते. त्याचं व्याकरणही जाणून घ्यावंच लागते... असो... भाषा कोणतीही असली तरी व्याकरणाचे नियम जड सगळ्यांना जातातच. तेवढ्यासाठी मराठी भाषेचा कंटाळा, तिटकारा करणं म्हणजे पाय दुखतात म्हणून ते कापून टाकण्यासारखंच आहे.
पाहा व्हिडीओ-