ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. १६ - शहराच्या मध्यभागी असलेल्या आयुष पेट्रोलपंपवर एका ग्राहकाला शंभर रुपयांचे अत्यल्प पेट्रोल दिल्यावरुन संतप्त नागरिकांनी पेट्रोल मालकाला सुमारे तीन तास वेठीस धरले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पेट्रोल पंपावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथक, मार्शल पथकासह दोन ठाणेदार, चार पोलीस उपनिरीक्षक व शिपायांचा ताफा घटनास्थळावर नियंत्रण ठेवून आहेत.
किशोर देशमुख यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले होते. ते सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास आपले वाहन ढकलत आयुष पेट्रोल पंपवर पोहचले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला १०० रुपयांचे पेट्रोल गाडीत टाकायला सांगितले. पेट्रोल टाकल्यानंतर त्यांना कमी पेट्रोल टाकल्याचा संशय आला. यानंतर वाहन बाजुला उभे करुन एका दुकानातून पाण्याची बाटली विकत घेतली. त्यातील पाणी फेकून दिले आणि त्यामध्ये वाहनात टाकलेले पेट्रोल ओतले असता त्यामध्ये अत्यल्प पेट्रोल दिसले. आपली शुद्ध फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच त्यांनी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला याचा जाब विचारला असता कर्मचा-यांनी त्यांना उध्दटपणे उत्तरे दिली. यावरुन त्यांच्यात वाद सुरू झाला. हा प्रकार नेहमीचाच असल्याची बाब लक्षात येताच तेथील काही वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांनी पेट्रोलपंपाकडे धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. बघता बघता शेकडोंचा संतप्त जमाव पेट्रोलपंपवर चालून गेला.
ही बातमी शहरात पसरताच अनेकजण घटनास्थळ गाठून पेट्रोलपंप मालक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना कडक शब्दात खडसावू लागले. गर्दी वाढतच होती. कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही वेळातच शहरचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे, रामनगरचे ठाणेदार विजय मगर, पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके, पपीन रामटेके, सतीश खेडेकर, संजय खोंडे हे पोलीस ताफ्यासह दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून दंगलनियंत्रण पथक व मार्थल पथकाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसील कार्यालयातून नायब तहसीलदार जी.सी. बर्वे व पुरवठा निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन लेखी स्वरुपात तक्रार लिहून घेतली. यावेळी वजनमाप विभागाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनीही याप्रकरणी किशोर देशमुख या ग्राहकाला लेखी तक्रार मागितली आहे.
फसवणुकीचा प्रकार नेहमीचाच
सदर पेट्रोल पंपवर कमी पेट्रोल देण्याचा प्रकार नेहमीचाच असल्यामुळे नागरिक सांगत होते. एखाद्या ग्राहकाने जाब विचारला तर सर्व कर्मचारी एकत्र येऊन त्याला तेथून हाकलून लावत असल्याचाही प्रकार येथे घडत असल्यामुळे कोणीही पुढे तक्रार करण्यास धजावत नव्हते. आज एकाचवेळी दोन तीन फसवणूक झालेले ग्राहक तिथे जमल्याने अन्य नागरिक या ठिकाणी धावून गेल्याचे दिसले.