नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नाम फाऊंडेशनच्या मदतीने आणि अभिनेता म्हणून ओळख असलेले नाना पाटेकरभाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज सायंकाळी नाना पाटेकर यांनी अमित शहा यांची भेट घेतली.
राजकीय पक्षांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अभिनेत्यांची जवळीक हवी असते. लोकसभेच्या तोंडावर अभिनेता सनी देओल यांना भाजपाने पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली होती. तसेच माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरही भाजपमध्ये येऊन खासदार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात जम्बो राजकीय भरती केल्यानंतर भाजपा जनमानसातील प्रभाव असलेला चांगला चेहरा घेण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभुमीवर नाना पाटेकर यांची अमित शहांशी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
नाना पाटेकर यांच्या राजकीय एन्ट्रीची याआधीही बरीच चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी यास नकार देत राजकारणात प्रवेश करण्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र, आज शहांच्या भेटीमुळे पुन्हा नाना पाटेकर चर्चेत आले आहेत.
पाटेकर यांनी अमित शहा यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. यानंतर त्यांनी ही भेट खासगी होती, राजकीय नव्हती असे सांगितले आहे. शहा यांना भेटण्याआधी पाटेकर यांनी अंतर्गत सुरक्षा विशेष अधिकारी यांची भेट घेतली.