आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.
पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन दिल्ली निवडणुक 2020 असं नाव देऊन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तानाजी चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अजय देवगणच्या चेहऱ्याच्या जागी अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकरणाऱ्या शरद केळकरच्या चेहऱ्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवण्यात आला आहे. तसेच उदयभान राठोडची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानच्या जागी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे.त्यामुळे या व्हिडिओवरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता दिसून येत आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना या व्हिडोओ संदर्भात विचारल्यानंतर मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवली आहे व त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो आहे. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया देतात हे मला पाहायचे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच शिवसेनेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सर्व संघटना आता कुठे गेल्या असा सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आली आहे. कोंढाणा किल्ला घेताना धारातिर्थी पडलेल्या तानाजी यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले होते. त्यानंतर, कोंढाणा या किल्ल्यास सिंहगड असे नाव देण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून सिंहगड गणला जातो. महाराष्ट्राच्या रणभूमीत तानाजी मालुसरेंनी पराक्रम गाजवला होता.
दरम्यान, 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्याअसलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे.