ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29 - जगातील सर्वाधिक खडतर सायकल स्पर्धा असलेल्या रेस अक्रॉस अमेरिका (रॅम)मध्ये नाशिककरांनी अभूतपूर्व यश मिळवत अमेरिकेत भारताचा तिरंगा फडकवला आहे. नाशिकचे रहिवासी श्रीनिवास गोकुळनाथ यांनी जगातील सर्वात अवघड सायकल रॅली पूर्ण करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तर नाशिकचेच डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील आणि डॉ. संदीप शेवाळे तसेच मुंबईच्या पंकज मार्लेशा या चार जणांच्या टीमनं सांघिक गट स्पर्धेत यश मिळवले.
हे सर्व सायकलवीर मायदेशी परतल्यानंतर नाशिककरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील पाथर्डी फाटा येथून त्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
वाळवंटातील रणरणते ऊन, बर्फाच्छादीत पर्वतरांगांतील गोठवणारी थंडी, पठारावरचे घोंगावणारे वादळ असे टप्प्याटप्प्यावरील निसर्गाचे आव्हान झेलत ४ हजार ८०० किलोमीटर अंतर पार करीत सांघिक गटात सह्याद्री ग्रुपने नववे, तर वैयक्तिक गटात आर्टिलरी सेंटरमधील लेफ्टनंट कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुलनाथ यांनी ७वे स्थान मिळवले. वैयक्तिक गटात जिंकलेले गोकुलनाथ हे पहिले भारतीय ठरले आहेत.
अत्यंत खडतर समजली जाणारी ही स्पर्धा अमेरीका खंडातील पश्चिम टोकापासून सुरू होवून पूर्वेच्या टोकाला संपते, हे ४ हजार ८०० किलोमीटर अंतर पार करताना १२ राज्यातून प्रवास होतो. यात तीन पर्वतरांगा, दोन वाळवंट व चार नद्या येतात, एक लाख ७० हजार फूट उंच इतकी चढाई करावी लागत असल्याने ही स्पर्धा पूर्ण करणेही आव्हानात्मक आहे.
या पूर्वी 2015 मध्ये नाशिकच्या डॉ. हितेंद्र आणि महिंद्र महाजन या बंधूंनी ही स्पर्धा पूर्ण करून "रॅम"वीर होण्याचा मान मिळवला होता.
या सायकलवीरांचं कौतुक करण्यासाठी गुरुवारी (29 जून) सकाळी झालेल्या स्वागत सोहळ्यात नाशिक सायकलीस्ट सदस्य आणि क्रीडाप्रेमी भर पावसात उपस्थित होते.
https://www.dailymotion.com/video/x8456u4