नंदकिशोर नारे
ऑनलाइन टीम
वाशिम, दि.१५ - मराठीत एक म्हण आहे...‘कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच..’ याचाच प्रत्यय मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे येथे आला अन सर्वत्र एकच हशा पिकला.
जऊळका रेल्वे येथील एका नागरिकाच्या घरात एका उघड्या बरणीत काही बिस्किटे ठेवण्यात आली होती. घरात कोणी नाही पाहून एका कुत्रा घरात शिरला व तो बरणीतील बिस्कीटे खाण्याचा प्रयत्न करू लागला. बरणीत तोंड जात नसतानाही कुत्र्याने त्याचे प्रयत्न सोडले नाही, एकदाचे त्याचे तोंड बरणीत गेले व त्याने बिस्किटही खाल्ले. मात्र त्यानंतर त्या कुत्र्याला बरणीतून तोंडच बाहेर काढता येईना, अनेक प्रयत्न करूनही त्याचे तोंड बाहेर निघता निघेना. ९ जुलै रोजी ही घटना घडली.
ती बरमी पारदर्शक असल्याने कुत्र्याला त्यातून बाहेरचे दिसायचे, मात्र तोंड आत अडकल्याने तो हवालदिल झाला होता. काही नागरिकांनी त्याला सोडवायचा प्रयत्न केला असता, घाबरलेला कुत्रा धूम ठोकायचा.
बरणीत अडकलेली कुत्र्याची मान सोडवण्यासाठी गावक-यांना तब्बल पाच दिवस लागले. १३ जुलै रोजी ग्रामस्थांनी कुत्र्याचा पाठलाग केला. कुत्रा जेव्हा एका पाईपमध्ये जावून बसला तेव्हा दोन्ही बाजुनी गावातील युवक उभे राहिले, त्याला बाहेर निघू दिले नाही. एका युवकाने घरी जावून उन्हाळयात वापरण्यात येत असलेली ग्रीन नेट आणली. एका बाजुने काही युवक उभे राहून पाईपच्या तोंडावर ग्रीन नेट लावली व दुसरीकडून युवकांनी दगड मारुन कुत्र्याला बाहेर हाकलले. जसा तो कुत्रा पाईपच्या बाहेर आला, तसं युवकांनी त्याला पकडला व सर्वांनी मिळून बरणीत अडकलेली त्याची मान सोडवली व अखेर त्या कुत्र्याची सुटका झाली.
सदर घटना बसस्थानकाजवळ घडल्याने बघ्यांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. हा प्रकार पाहतांना बघ्यांना हसू आवरता आवरत नव्हता. कुत्र्याला या संकटातून मुक्त करण्यासाठी प्रवेश अवचार, संजय रावेकर, संतोष झळके, आशिष कडू, लक्ष्मण चोपडे, किशोर आमटे व प्रदिप बरगट यांनी प्रयत्न केले.