ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २१ - दिवाळी या सणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फराळ. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेल्या राज्यातील नामांकित खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी संकेतस्थळ आणि विविध मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून यंदा दिवाळीचा संपूर्ण फराळ आॅनलाईन बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे फराळ तयार करण्यासाठी अजिबात उसंत नसलेल्या महिलांकरीता खाद्यपदार्थ विक्रेत्यांची ही नामी शक्कल आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
दिवाळी आता आठ दिवसांवर येऊन ठेपली असून, दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीची ही धामधुम लक्षात घेऊन राज्यातील नामांकित खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दिवाळीचा संपूर्ण फराळ आॅनलाईन बुक करण्याची नामी संधी तमाम खवैयेगिरांकरीता उपलब्ध करून दिली आहे. धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे खरेदी तर दूर, साधा दिवाळीचा फराळ तयार करण्याचीही उसंत न मिळणाºया या महिलांकरीता, आॅनलईन खाद्यपदार्थ खरेद करण्याची ही आॅफर आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. वास्तविक पाहता चार-पाच वर्षांपूर्वीच ‘आॅनलईन फराळ’ ही संस्कृती उदयास आली. फराळाची आॅर्डर देण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असल्यामुळे ती अधिक रूजली. तीचे नवे आणि अत्याधुनिक स्वरूप खवैयेगिरांना विशेषत: महिलावर्गाला आकर्षीत करीत आहे. किलोनुसार ‘हँपर्स’ उपलब्ध असल्यामुळे, दिवाळीच्या फराळात कोणकोणते मेन्यू असावेत याची निवड करणे आता महिलांना सहज शक्य होणार आहे.
विविध प्रांतातील चविष्ट पदार्थ
करंजी, बेसन लाडू, भाजणीची चकली, गोड-खारे शंकरापळे, शेव, अनारसे, पोह्यांचा चिवडा, चिरोटे कडबोली, मक्याचा चिवडा, कुरमुरे चिवडा, सॅण्डविच शंकरपाळी, दुधापासून बनविलेले विविध पदार्थ, तसेच गुजराती, राजस्थानी असे देशातील विविध प्रांतातील चविष्ट खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. या प्रत्येक पदार्थांचा फोटा, त्याचे किलोप्रमाणे दर आणि ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी लागणारा सर्व्हिस चार्ज आदि सर्व माहिती संकेतस्थळे व मोबाईल अॅप्सवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ‘कॅश आॅन डिलिव्हरी’सुविध उपलब्ध असल्यामुळे दिवाळीचा फराळ अधिक रूचकर व गोड होणार आहे.