राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि अन्य आमदार दिसत आहे. हॉटेलमध्ये एका सर्व आमदार एकत्र असल्याचंही त्यात दिसत आहे. नुकतंच एकनाथ शिंदे यांनीही ट्वीट करत काही संकेत दिले. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून संवाद साधत बंडखोरी केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली. तुम्हाला मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल, तर तसे समोर येऊन सांगा. माझा राजीनामा मी तयार ठेवतो. केवळ मुख्यमंत्री नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही मी तयार आहे. मात्र, हे सगळं तुम्ही समोर येऊन सांगा. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर काय करायचं, असा प्रश्न करत, वर्षा बंगला सोडून आता मी मातोश्रीवर जातो, असे सांगत अनेक भावनिक मुद्द्यांना हात घातला. यानंतर एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ट्विटरवरून चार मुद्दे मांडत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला उत्तर दिले.