लक्ष्मण सरगरलोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : आटपाडी तालुक्यातील य.पा.वाडी गावच्या एका वयस्कर शेतकऱ्याने वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चक्क इंग्रजी भाषेत संवाद साधला. यावेळी या शेतकऱ्याने आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला असून अधिकारी व वयस्कर शेतकरी यांच्या या संभाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
आटपाडी तालुक्यामध्ये महावितरण विभागाने वीज चोरी रोखण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून शेती पंपासाठी होत असणारी वीजचोरी पकडण्यासाठी आटपाडी महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता सुनील पवार हे पथकासोबत आटपाडी तालुक्यातील य.पा वाडी गावी मंगळवारी दुपारी वीज चोरी पकडण्यासाठी गेले होते. यावेळी य.पा.वाडी गावचे रहिवासी वेताळ चव्हाण हे वयस्कर शेतकरी हे आपल्या शेतामध्ये होते. त्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपासाठी आकडा टाकून वीज घेतल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी वीजचोरी पकडण्यासाठी पथक आल्याचे समजले नंतर वयस्कर शेतकरी वेताळ चव्हाण यांनी पथकासोबत असलेले अधिकारी सहाय्यक अभियंता सुनील पवार याच्याशी इंग्रजी मधून संवाद साधत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकारी सुनील पवार यांनीही वयस्कर शेतकरी चव्हाण यांच्याशी इंग्रजी मधून उत्कृष्ट संभाषण करत त्यांची बाजू ऐकून घेत वस्तुस्थिती विशद केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान यावेळी एक वयस्कर शेतकरी व अधिकारी यांच्यात इंग्रजी मध्ये झालेले संभाषण पथकातील कर्मचारी यांनी चित्रित केले असून चित्रित केलेला व्हिडिओ मंगळवारी दुपार पासून सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून समाज माध्यमातून याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.