- हरिहर गर्जे/आॅनलाइन लोकमत
पाथर्डी (अहमदनगर), दि़. 5 - महामार्गावरील मद्यालये सरकारने बंद केली, मात्र पाथर्डीत थेट सरकारी विश्रामगृहच मद्यालय बनले आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी सायंकाळी येथे ‘स्टिंग’करत तळीरामांचा आँखो देखा हाल टिपला. एका नगरसेवकाने आपले बिंग फुटल्याचे पाहून धूम ठोकली. पाथर्डीच्या विश्रामगृहावर नेहमीच तळीरामांचा अड्डा जमतो, अशी कुणकुण ‘लोकमत’ला लागली होती. खातरजमा करण्यासाठी या बाबीचे स्टिंग करण्यात आले. त्यावेळी खरोखरच डायनिंग टेबलवर मद्याची पार्टी रंगलेली दिसली. सरकारी इमारतीत मद्यपानाला बंदी असताना बिनधास्त ‘एकच प्याला’ सुरु होता. पालिकेचा एक विद्यमान व एक निवृत्त कर्मचारी तर्रर्र झाले होते. एक नगरसेवकही त्यांच्या सोबतीला होते. ‘लोकमत’ टीमला पाहून त्याने धूम ठोकली. हे महाशय एवढे बेफान झाले होते की लघुशंका कोठे करावी? याचीही त्यांना शुद्ध राहिली नव्हती. विश्रामगृहाचे कर्मचारीही या बाबीचे साक्षीदार आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता येथे नेहमीच तळीरामांचा त्रास सहन करावा लागतो, असे ते म्हणाले. विरोध केला तर आम्हाला थेट बदलीची धमकी दिली जाते, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तळीरामांकडून नेहमीच गैरवापरविश्रामगृहाच्या पाठीमागील बाजूला दारुच्या बाटल्यांचा खच पडला होता. विश्रामगृहाबाहेर अंधार असतो. समोरचा दरवाजा बंद असतो. पाठीमागील बाजूने प्रवेश करुन तळीराम बिनधास्तपणे या शासकीय वास्तूचा दारुचा अड्डा म्हणून वापर करतात.
https://www.dailymotion.com/video/x844vjy