जगदीश कोष्टी, ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. २ - मराठी चित्रपटसृष्टीने वेगवेगळ्या पेशांवर आधारित अनेक चित्रपट दिले. ‘हमाल दे धमाल’ चित्रपट तर प्रचंड गाजला; परंतु रिक्षावर कोणताच मराठी चित्रपट आला नाही. ज्या रिक्षानं अनेकांचे संसार उभारले, सुख-दु:खात साथ दिली. त्या रिक्षावर चित्रपट काढण्याचा निर्णय साता-यातील रिक्षावाला सिराज काझी यांनी घेतला. चित्रपट काढण्याएवढे आर्थिक पाठबळ नसल्यानं काझी यांनी चक्क वडिलोपार्जित आलेली स्वत:ची चाळीस गुंठे शेती विकलीय.
‘हौसेला मोळ नसतं’ म्हणतात हे विधान साता-यातील सिराज काझी यांनी तंतोतंत सत्यात उतरवलं. टीव्ही, चित्रपटात आपणही दिसावं, असं सिराज यांना लहानपणापासून वाटत होतं; पण पोटाची खळगी भरल्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. त्यामुळे फलटण तालुक्यातील तरडगाव सोडून सिराज साताºयात आले. साता-यात आल्यावर रिक्षा खरेदी करून रिक्षा व्यवसाय सुरू केला.
मुंबई मायानगरीत गेल्यावर अनेकांचं आयुष्यच बदललं, असं सांगतात. पण ‘सॉलिवूड’ भी कुछ कम नहीं याचा प्रत्यक्ष सिराज यांना साता-यात आल्यावर आला. साताºयात लाभलेल्या निसर्ग वरदानामुळे अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण सातारा, पाचगणी, महाबळेश्वर, कास, बामणोली परिसरात होते. या चित्रपटांच्या निर्मिती संस्थांना मदत करण्याची संधी सिराज यांना मिळाली. त्या ठिकाणी डबे पोहोचविणे, इतर कामे असल्यास ते करत होते. हे करत असतानाच स्वप्न साकारण्याची संधी मिळाली. ‘बापू बिरू वाटेगावकर’, ‘कुंकू झालं वैरी’, ‘बाबा लगीन’मध्ये रिक्षावाला, ‘गंगाजल’मध्ये गाण्यात तर भोजपुरी रंगोली चित्रपटात इन्स्पेक्टरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. क्राईम मालिकेत पोलिसांची भूमिका साकारली.
संधी मिळेल तेव्हा ते काम करत असतानाच पोटापाण्यासाठी रिक्षा व्यवसाय सुरूच होता. या रिक्षाने अनेक कठीण प्रसंगात साथ दिली. अनेक अनुभव आले. या अनुभवावर आधारित चित्रपट स्वत:च काढण्याचा निर्णय सिराज यांनी घेतला. त्यांच्या या कल्पनेला त्यांचे मित्र कॅमेरामन हिरालाल आतार यांची साथ लाभली.
सिराज यांनी काही दिवसांपूर्वीच स्वत:च्या नावावरून ‘एस. के. फिल्म’ या चित्रपटनिर्मिती संस्थेची स्थापना केली. याच्या माध्यमातून ‘झटपट लखपती रिक्षावाला’ हा चित्रपट ते काढत आहेत. यामध्ये कॅमेरामनची जबाबदारी हिलालाल आतार सांभाळणार आहेत. या चित्रपटात चार गाणी असून, त्यांचे रेकॉर्डिंगही झाले आहे. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अन बेला शेंडे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन सिराज काझी यांचेच आहेत. हरिओम गुरू सुरदास यांचे संगीत लाभले आहे.
ठेका धरायला लावणारे शीर्षक गीत
‘झटपट लखपती रिक्षावाला’ या चित्रपटाचे ध्वनी मुद्रण नुकतेच झाले. त्यातील शिर्षक गीत असलेले ‘आला रे आला रिक्षावाला’ हे आनंद शिंदे यांनी गायले आहे. उडत्या चालीवर अन् ठेका धरायला लावणारे याचे संगीत आहे. तसेच बेला शेंडे यांची ‘नटली गं...’ अन् ‘धुंदीत मस्तीत’ ही गाणे तरुणाईला पसंतीस उतरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
चित्रपटात काम करत असतानाच रिक्षा व्यवसायावरही चित्रपट असावा, असे मनापासून वाटत होते. पण त्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे वडिलोपार्जित आलेली चाळीस गुंठे जमीन विकली. एक मुलगा इंजिनिअर असून, दुसरा शिक्षण घेत आहे. सर्वजण स्थिर झाले असल्याने घरातील सर्वांनीच माझ्या निर्णयाला विरोध न करता पाठिंबाच दिला आहे.
- सिराज काझी, दिग्दर्शक.