ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 29 - स्वातंत्र्यपूर्व काळात दमणी, बैलगाडीच दळणवळणाचे साधन होते. त्याकाळात वाहने नसल्यामुळे गावाला जाण्यासाठी ग्रामीण भागात दमणीचा सर्वाधिक वापर व्हायचा. परंतु काळ बदलत गेला. वाहनांची सुविधा निर्माण झाली आणि एकेकाळी दळणवळणाचे मुख्य साधन असलेली दमणी हद्दपार झाली. ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये दमणी ही शोभेची वस्तू बनली आहे. 30 ते 40 वर्षांपूर्वी दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे दमणी, बैलगाडीतूनच प्रवास करावा लागत असे. ज्याच्या घरी चारचाकी कार तो व्यक्ती श्रीमंत समजला जाई. परंतु एकेकाळी ज्याच्या घरी दर्जेदार बैलजोडी, श्रृंगाराने नटलेली दमणी असायची. तो व्यक्ती गावात श्रीमंत समजला जायचा. लग्नामध्ये नवरदेवाची दमणीतून वरात काढली जात असे. लग्नाला जायचे तर नवरदेवासाठी खास सजविलेली दमणी राहायची आणि वऱ्हाडी मंडळींसाठी बैलगाडी असायची. परंतु काळ बदलत गेला. समाजाचा आणि पर्यायाने रस्त्यांचा विकास झाला. गावे रस्त्यांनी जोडली गेली. चारचाकी, दुचाकी वाहने आली आणि दमणी मागे पडली. आता ही दमणी गावागावांमधील घरांमध्ये एक शोभेची वस्तु बनली आहे. परंतु दमणीचे आकर्षण मात्र कमी झालेले नाही. अनेक ठिकाणी पर्यटनासाठी दमणीचा वापर केला जातो. अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसरात एक पुरातन ठेवा म्हणून दमणी जपण्यात येत आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे दमणी लक्ष वेधून घेते.
VIDEO- दमणी बनली शोभेची वस्तू !
By admin | Published: December 29, 2016 5:08 PM