ऑनलाइन लोकमत
वसई, दि. १५ - वसई तालुक्यातील धानीव बाग परिसरात दोन अल्पवयीन मुलांना ७ ऑक्टोबरच्या रात्री पाच जणांनी पट्टा, चप्पल आणि लाथाबुक्कांनी मारहाण केली होती. मारहाणीत जबर जखमी झालेल्या दोन्ही मुलांची वालीव पोलिसांनी साधी तक्रारही दाखल करून घेतली नव्हती. पण, संध्याकाळी अमानुष मारहाणीचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील तीन आरोपी फरार झाले आहेत.
धानीव बाग येथील भागवत टेकडी येथील दोन अल्पवयीन मुलांवर चोरीचा आळ टाकून पाच जणांनी ७ आक्टोबरच्या रात्री उशीरा त्यांना तब्बल चार तास अमानुष मारहाण केली होती. मुलांना पट्टा, चप्पल आणि लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारणात आले होते. इतकेच नाही तर दोघांना एका खोलीत बंद करून तिथे तब्बल दोन तास अमानुष मारहाण केली होती. मुलांच्या पालकांनी अमानुष मारहाणीत जखमी झालेल्या दोघांना वालीव पोलीस ठाण्यात नेले होते. मात्र, गरीब घरातील असलेल्या मुलांना पोलिसांनी तक्रार न घेताच पिटाळून लावले होते.
धक्कादायक बाब म्हणजे मारहाण होत असताना लोकांनी मोठी गर्दी केली होती. पण, अमानुषपणे मारहाण करणा-यांना थांबवण्यासाठी अथवा मुलांना वाचवण्यासाठी एकही जण पुढे आला नाही. या मारहाण करणा-या पाच जणांची या भागात प्रचंड दहशत असल्यानेच कुणी त्यांना अडवण्यासाठी पुढे आले नाही असे येथील लोकांचे म्हणणे आहे. पोलिसांशी या पाच जणांची चांगली दोस्ती असल्याने पोलिसांनीही कारवाई केली नाही, असेही येथील लोकांचे म्हणणे आहे.
पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने मुले आणि पालक पुन्हा मारहाण होईल या भितीपोटी गप्प बसले होते. मात्र, शनिवारी या मारहाणीचा व्हिडीओ वायरल झाला. त्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून दीपक सिंग आणि मुकेश यादव या दोघांना शनिवारी रात्री आठच्या सुमारास अटक केली. मारहाण करणारे तीन जण फरार झाले आहेत.
याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे. यात दोषी आढळलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांची विभागीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.