ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 31 - रेल्वे पकडण्यासाठी धावलेल्या प्रवाशाचा जीव लोहमार्ग पोलिसांनी वाचवला. गाडी पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच तोल जाऊन हा प्रवासी प्लॅटफॉर्म व गाडीच्या मधील मोकळ्या जागेत पडला. हे दृश्य पाहताच तात्काळ धावलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवत सुखरूप बाहेर काढले. ही घटना शनिवारी सकाळी घडली असून सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे.
वरिष्ठ निरीक्षक संजय सातव व सहायक निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावर दररोज साध्या वेशात गस्त घालण्यात येते. चोरट्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी सचिन पवार आणि नितीन बिडकर हे गस्त घालीत होते. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पुणे -गोरखपुर एक्स्प्रेस लागली होती.
गाडी निघाली असताना डब्यात जागा मिळवण्यासाठी चालू गाडीमध्ये धावत जाऊन एका प्रवाशाने चढण्याचा प्रयत्न केला. डब्यात चढत असताना तोल जाऊन तो रुळाशेजारील मोकळ्या जागेमध्ये पडला. तो निम्मा बाहेर आणि निम्मा आत अडकलेला होता. हे दृश्य पवार व बिडकर यांनी पाहिले. ते दोघेही या प्रवाशाला वाचवण्यासाठी धावले.
तो गाडीखाली येण्याची दाट शक्यता असल्याने दोघांनी तत्परता दाखवत त्याला पकडून ठेवले. हळु हळु त्याला वर खेचले. पोलिसांनी तत्परता दाखवत बिहारच्या या प्रवाशाचे प्राण वाचवले.
https://www.dailymotion.com/video/x844q7b