नवी दिल्ली - भाजपा नेत्या आणि दिंडोरी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार यांनी संसेदत शेतकरी कर्जमाफी आणि जलशक्ती मंत्रालयाचा मुद्दा मांडला. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही पवार यांनी केली. नाशिकमधील कांदा उत्पादकांचा प्रश्न मांडताना, कांद्याला 2 हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणीही भारती पवार यांनी केली. भारती पवार यांच्या भाषणाचे कौतुक होत असतानाच, दुसरीकडे त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरलही होत आहे.
महाराष्ट्रात कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठा निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच, येथील शेतकऱ्यांसाठी उपाययोजनाही कराव्यात, अशी मागणी पवार यांनी केली. तसेच जलशक्ती मंत्रालयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानते, असे भारती पवार यांनी म्हटले. भारती पवार यांनी मुख्यमंत्र्याचे नाव घेताच, बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रितम मुंडे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई खासदार रक्षा खडसे यांना हसूच आवरले नाही. म्हणजेच, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली, असे म्हणताच या दोन्ही महिला खासदारांनी चक्क बेंचखाली डोके नेऊन हसू आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोन्ही महिला खासदारांची हास्यास्पद कृती कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत.
फेसबुकवरील Save maharashtra from bjp या फेसबुक पेजवरुनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली म्हणताच, हसू आवरले नाही. असे कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आले आहे. दरम्यान, संसदेत शेतकऱ्यांच्या गंभीर विषयावर चर्चा होत असताना, या खासदारांकडून खिल्ली उडविण्यात येत असल्याचे सांगत सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.