ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - गेली अनेक वर्षे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून वेळेवर मुंबईकडे रवाना होणारी डेक्कन क्वीन (12124) गेल्या तीन महिन्यांपासून प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून सोडण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी प्रवाशांनी सोमवारी ( 10 जुलै ) डेक्कन क्वीन तब्बल एक तास रोखून धरली होती. गाडी पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर डेक्कन क्वीन मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान, प्रवाशांच्या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
झेलम व इतर गाड्यांना ज्यादा डबे लावण्यात आल्याने सकाळी येणाऱ्या या गाडीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जागा द्यावी लागते. त्यामुळे सकाळी 7. 15 वाजता सुटणारी डेक्कन क्वीन फेब्रुवारी महिन्यापासून प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरुन सोडण्यात येते आहे. मुंबईकडे दररोज जाणारा नोकरदार वर्ग, व्यापारी यांना त्यामुळे सकाळी गाडी पकडण्यासाठी धावपळ करावी लागते.
त्यात अनेक गाड्या याच वेळी येत असल्याने पादचारी पुलावर नेहमी गर्दी असते.
त्यामुळे अनेकांची गाडी चुकते. डेक्कन क्वीन पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सोडावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्यानं शेवटी सोमवारी प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली. यावेळी 2 पोलीस स्टेशनवर आले, मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुणीही आले नाही. शेवटी रेल्वे अधिकारी स्टेशनवर दाखल झाले व आज गाडी जाऊ द्या, उद्या निर्णय घेऊ, असे आश्वासन प्रवाशांना मिळाल्यानंतर डेक्कन क्वीन सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे रवाना करण्यात आली.
आणखी वाचा