पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागताला पालकमंत्री आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार उभे होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी ,'आपके राज्य में हम आपकी बिना परमिशन के आ गए है', असे म्हटले. तेवढ्यात अजित पवारांनीही हात जोडून 'असे काही नाही' म्हणत स्वागत केले.
अजित पवारांचा पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर वचक आहे. राज्यपाल कोश्यारी यांनाही हे माहिती आहे. राज्यात सध्या पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील 'संघर्ष' वादाचे स्वरूप घेऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पवार कुटुंबीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर बैठका सुरु आहेत. पार्थ पवार यांच्या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावरून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. यानंतर तातडीने अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. तसेच शुक्रवारीही बैठकांचे सत्र सुरु होते.
आज राज्यपाल कोश्यारी यांनी पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण केले. विधानभवन, पुणे इथं हा सोहळा पार पडला. राज्यपाल ध्वजारोहण सोहळ्यासाठी पोहोचले असता त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. राज्यपालांच्या या टोल्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या सह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थित होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत
Independence Day : मोठी घोषणा! नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु; पंतप्रधानांनी सांगितला फायदा