ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 29 - स्कायमेटने वर्तचलेल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हयात गारांचा पाऊस कोसळत आहे. तासगाव तालुक्यातील सावळज सिद्धेवाडी, अंजनी, डोंगरसोनी, दहिवडी, गव्हाण, वज्रचौंडे, या गावात गारांचा तर, कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटनान्द्रे, तिसंगी, कुंडलापुर , कुच्ची या गावात जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर शहरातही अवकाळी पाऊस सुरू आहे. उन्हाच्या कडाक्यानंतर साडेचार वाजल्यापासून गारांसह पाऊस कोसळत आहे.सांगली, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये येत्या चार तासात पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली होती. अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा उध्वस्त होण्याची भीती आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी देशातील पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी वार्षिक सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवलेल्या मान्सूनच्या अंदाजाशी मिळताजुळता आहे. स्कायमेटने या वर्षी सरासरी 95 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे.
भारताची ६० टक्के लोकसंख्या ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सून कसा असणार याविषयी सर्वांनाच सर्वाधिक उत्सुकता असते. यंदा पर्जन्यमानाच्या दृष्टीने भारतासाठी हे वर्ष सर्वसामान्य वर्ष असेल. संपूर्ण देशभरात चांगला पाऊस होईल. यावर्षी देशाच्या वार्षिक सरासरीच्या 96 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
याआधी स्कायमेटचा यंदाच्या पर्जन्यमानाबाबतचा अंदाज प्रसिद्ध झाला होता. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेने वर्तवली होती. त्यात ५ टक्के कमी अधिक फरक पडू शकतो. देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवणार असल्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली होती.
तर दुसरीकडे, दरवर्षी पर्जन्य नक्षत्र आणि त्यांची वाहने यावरून पंचांगात पावसाचा अंदाज दिलेला असतो. अर्थात या अंदाजाला वैज्ञानिक आधार नसला तरी हा अंदाज पर्जन्य नक्षत्राच्या वाहनांप्रमाणे जुन्या ठोकताळ्यांवर आधारित असतो. या अंदाजाप्रमाणे या वर्षी पाऊस चांगला सरासरीएवढा परंतु अनियमित पडेल, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
पावसाविषयी वेधशाळेने व्यक्त केलेला अंदाज हा वैज्ञानिक निकषांवर आधारित असतो. तो अधिक विश्वासार्ह असावयास हवा आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात हवामानाचा अंदाज बऱ्याच प्रमाणात अचूक येतो; कारण तेथील वेधशाळांकडे अत्याधुनिक उपकरणे आहेत.
वेधशाळांची संख्याही जास्त आहे. तसेच तेथील वेधशाळांकडे मागच्या अनेक वर्षांचा जुना तपशील उपलब्ध आहे, आपल्याकडे या गोष्टींची कमतरता आहे. तसेच भौगोलिकदृष्ट्या आपल्याकडील पावसाचा अंदाज वर्तविणे तसे खूप कठीण आहे, हेही खरे आहे. परंतु डॉप्लर यंत्रणा उभारणीविषयी चाललेली चालढकल पाहता येथे याविषयी इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे आढळते, अशी खंत सोमण यांनी व्यक्त केली. अशा यंत्रणा उभारणीकडे जास्त गांभीर्याने पाहायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
https://www.dailymotion.com/video/x844wk1