अझहर शेख, आॅनलाइन
नाशिक, दि. २७ - शहरातील पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या पंडीत जवाहरलाल नेहरु वनउद्यानात वनऔषधी उद्यान साकारण्याचा निर्धार शहरातील सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सहा महिन्यांपूर्वी व्यक्त केला. मात्र या वनऔषधी उद्यानाचा कामाला अद्याप मुहूर्तच मिळालेला नाही.
नाशिक शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले शहराचे आॅक्सिजन हब अर्थात नेहरु वनउद्यान. या वनउद्यानात हजारो प्रजातीची लहान मोठी वृक्ष आहेत. भारतीय प्रजातीची वृक्षसंपदा या ठिकाणी वनविभागाने जतन करुन ठेवली आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून या उद्यानात कुठल्याही प्रकारे नैसर्गिक अधिवासाला धक्का न लावता वनऔषधी उद्यान विकसीत करण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी काही महिन्यांपुर्वी केली होती. नाशिक दौºयावर आल्यानंतर ठाकरे यांनी या उद्यानाला आवर्जून भेट देत पाहणीही केली होती. घोषणा, भेटी, पाहणी दौरा उरकल्यानंतर वनउद्यानामध्ये वनऔषधी उद्यानाच्या कामाची कोणतीही चिन्हे दिसत नाही. केवळ वनउद्यानाच्या प्रवेशद्वाराचे नव्याने बांधकाम केले जात आहे. लोखंडी कमान काढून सिमेंट-कॉँक्रीटच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. वनऔषधी उद्यान साकारण्याबरोबरच नेहरु वनउद्यानाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न टाटा ट्रस्टकडून देण्यात येणार असल्याचे राज म्हणाले होते. राज ठाकरे यांनी यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांच्याकडून वनऔषधी उद्यानाची परवानगी मिळविली होती. त्यानंतर नेहरु वनउद्यानाची जबाबदारी वनविभागाकडून वनविकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आली. या उद्यानामध्ये वनविभागामार्फत अनेक वनऔषधी रोपांची लागवड करुन ती वाढविण्यातही आली आहे. तसेच नक्षत्रवनही तयार करण्यात आले आहे. याबरोबरच निसर्ग परिचय केंद्र, खुले रंगमंच, झोपडीचे पॅगोडे, सभागृह, प्रसाधनगृह, बाल उद्यान, बांबुवनाखाली ओटे बांधले आहेत.