ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 26 - बडनेरा-अमरावती राज्य मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावरील अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाच्या श्रेयावरून जिल्ह्याचे खासदार व बडनेरा मतदारसंघाच्या आमदारामध्ये उदभवलेल्या वादाला सोमवारी हिंसक वळण लागले. पत्रकार परिषदेतून आमदार राणांनी खासदारांविरुद्ध अपशब्द वापरल्याच्या रागातून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान संघटनेच्या बडनेरातील कार्यालयाची प्रचंड तोडफोड केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.याप्रकरणी आ. राणांनी बडनेरा पोलिसात तक्रार नोंदविली असून पोपिलांनी युवासेनेच्या सात कार्यकर्त्यांसह खासदरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, बडनेरा- अमरावती राज्य मार्गावरील नरखेड रेल्वे पुलाचे बांधकाम अर्धवट असताना आ. राणा यांनी शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी पुलाचे उद्घाटन करून हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू केला. त्यानंतर काही वेळाने खा. अडसूळ यांनीदेखील फीत कापून, नारळ फोडून या पुलाचे रीतसर उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. लगेच दुसऱ्या दिवशी शनिवारी २४ डिसेंबर रोजी आ. राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन खा. आनंदराव अडसुळांवर आरोप करताना अपशब्दांचा वापर केल्याचा आरोेप करीत २६ डिसेंबर रोजी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी राणांच्या बडनेरा येथील कार्यालयाची तोडफोड केली. आ. राणा आणि खा. अडसुळांचे समर्थक एकत्र आल्याने काही वेळ तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. राणांच्या राजापेठस्थित कार्यालयासमोरही पोलीस बंदोबस्त तैनात होता. कार्यालयाची तोडफोड, महापुरूषांच्या प्रतिमेची अवहेलना, दलित महिलेला मारहाण, शिवीगाळप्रकरणी आ. रवि राणा, मंगेश चव्हाण यांच्यासह एका महिलेच्या तक्रारीवरून युवासेनेच्या सात कार्यकर्त्यांसह खा. अडसुळांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बडनेरा पोलिसांनी सुमीत झंझाड, तुषार अंभोरे, गजेंद्र पाटेकर, प्रवीण विधाते, विक्रम लाड, मयंक यांच्यावर १४३, १४६, ३५४, १९५, १४७ कलम ३ (ब) अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
VIDEO- रवी राणांच्या कार्यालयाची तोडफोड
By admin | Published: December 26, 2016 7:02 PM