- ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 3 - कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ शनिवारी परभणी शहरातून काढण्यात आलेल्या अभूतपूर्व आणि विशाल मोर्चाने जिल्ह्यातील यापूर्वीच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले. साधारणत: ७ लाख समाजबांधवांनी शिस्तीचे दर्शन घडवित आपल्या मागण्या जिल्हा प्रशासनासमोर मांडल्या. कुठल्याही नेतृत्वाविना एकवटलेल्या मराठा समाज बांधवांनी या मोर्चाच्या निमित्ताने एकीचे दर्शन घडविले.
औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जवळगाव नंतर परभणी शहरातही मराठा समाज बांधवांच्या वतीने मागील १५ दिवसांपासून निषेध मोर्चाची जय्यत तयारी केली जात होती. जिल्ह्यातील विविध खेड्यांमधून आणि शेजारील जिल्ह्यांमधून शनिवारी सकाळी ९ वाजेपासूनच समाजबांधव गटा-गटाने दाखल होत होते. शहरातील जिंतूररोडवरील नूतन विद्यालयाच्या परिसरात पुरुषांसाठी आणि महात्मा फुले शाळेच्या मैदानावर महिला एकत्रित आल्या होत्या. या मोर्चाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. आयोजकांनी स्वतंत्र २ हजार स्वयंसेवकांची यंत्रणा कार्यान्वित केली होती. मोर्चासाठी विक्रमी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन शहरातील मुख्य मार्गावरील जड वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली. तसेच शहरामध्येही एकेरी मार्गावरुन वाहतूक सुरु ठेवली होती.
दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. शिस्तबद्धपणे कुठल्याही घोषणा न देता मोर्चेकरी हातात फलक आणि गळ्यामध्ये काळी फित बांधून, हातात भगवे झेंडे घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होते. लाखो मराठा समाज बांधव मोर्चात सहभागी झाल्याने शहरातील संपूर्ण वातावरण मोर्चामय झाले होते. सव्वा बारा वाजता निघालेला हा मोर्चा जेल कॉर्नर, नानलपेठ, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दुपारी १.०५ वाजता धडकला. मोर्चातील समाज बांधवांची संख्या एवढी मोठी होती की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पहिला मोर्चेकरी पोहचला त्यावेळी शेवटचा मोर्चेकरी ४ कि.मी.दूर असलेल्या नानलपेठ परिसरात होता. त्यामुळे सर्व मोर्चेकऱ्यांना नियोजितस्थळापर्यंत पोहचता आले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ध्वनीक्षेपकावरुन मोर्चेकऱ्यांना शांतता आणि शिस्तीचे आवाहन केले जात होते. पुरुष आणि महिला स्वयंसेवक गर्दी होऊ नये, यासाठी कार्यरत होते. मोर्चाच्या अग्रभागी युवती, त्यानंतर महिला त्यांच्यापाठीमागे पुरुषांची रांग होती. सुरुवातीला महिला आणि युवती मोर्चास्थळी दाखल झाल्या. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुने असलेल्या रस्ता आणि मोकळ्या मैदानावर बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत ‘जय जिजाऊ जय शिवराय’चा जयघोष करण्यात आला. त्यानंतर जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. तीन विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर एका विद्यार्थिनीने कोपर्डी येथील घटनेच्या प्रकरणात आपल्या भावना व्यक्त केल्या. पाच विद्यार्थिनी आणि पाच विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांना सादर केले. त्यानंतर निवेदनाचे वाचन करण्यात आले. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रगीत घेऊन या मोर्चाची सांगता झाली.
मुख्यमंत्री महोदय, मला न्याय द्या...
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चा दाखल झाल्यानंतर एका विद्यार्थिनीने कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या भावना उपस्थितांसमोर व्यक्त केल्या. मी श्रद्धा बोलयेत, अशी सुरुवात करीत सांगा मी काय गुन्हा केला होता. मला मोठे व्हायचे होते, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. परंतु, मला संपविण्यात आले. सांगा माझा काय गुन्हा होता. मुख्यमंत्री महोदय मला न्याय द्या. या राज्यात आमची मुले असुरक्षित आहेत. हा अत्याचार किती दिवस सहन करायचा, अशा भावना व्यक्त करित मुख्यमंत्री महोदय मला न्याय हवा, अशी आर्त मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चातून शिस्तीचे आणि एकीचे दर्शन
परभणी शहरातून मराठा समाज बांधवांनी काढलेल्या मोर्चातून शिस्तीचे आणि एकीचे दर्शन घडविले. सात लाखांवर समाजबांधव एकत्र आले असतानाही कुठेही गडबड, गोंधळ झाला नाही. शांततेच्या वातावरणात, कोणत्याही घोषणा न देता या मोर्चेकऱ्यांनी संयमाने आपल्या भावना व्यक्त केल्या. परभणी शहरातून निघालेला हा पहिलाच मोठा मोर्चा ठरला. या मोर्चाने यापूर्वीच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढले. पोलिस कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी मोर्चेकऱ्यांना शिस्तीत मोर्चास्थळापर्यंत वाट काढून दिली. ठिकठिकाणी मानवी साखळी आणि बॅरिकेटस् लावले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या मोर्चाची सांगता झाली.
महिलांचा लक्षणीय सहभाग
औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जळगाव या ठिकाणी निघालेल्या विशाल मोर्चाच्या तुलनेत परभणीच्या मोर्चामध्ये महिलांची अधिक उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्वच गावांमधून मराठा समाजबांधव सहकुटुंब सहभागी झाले होते. त्यामुळे परभणीचा मोर्चा इतर मोर्चाच्या तुलनेत वेगळा आणि विक्रमी ठरला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, अशा सर्वस्तरातील समाज बांधवांनी या मोर्चाला उपस्थिती लावली.