ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - होय आम्ही दारु पित होतो...पत्नी आणि मुलांना मारहाण करत होतो...शिव्या देत होतो...पैसे उडवत होतो...पण हे सर्व चित्र मी स्वत:शी प्रामाणिक राहून बदलले आहे हा अनुभव आहे दारुचे व्यसन असलेल्या तरुणाचा. स्वत:मध्ये बदल घडवितानाच इतरांमध्येही बदल घडविण्यासाठी पुर्वाश्रमीचे ‘व्यसनी’ प्रयत्न करीत आहेत. ‘दारु सोडायची आहे, पण जमत नाही? आम्हाला जमले! असे सांगत दारु सोडविण्यासाठी अल्कोहोलिक अॅनॉनिमसचे कार्यकर्ते झटत असून दररोज शहरातील विविध भागांमध्ये एकत्रित भेटून अनुभव कथन करुन सुधारणेची मोहित राबवित आहेत.
मद्यपाश हा एक भयानक व कावेबाज आजार आहे असे हे सर्वजण स्वत:च सांगतात. मद्याच्या व्यसनामुळे आयुष्य उध्वस्त व्हायची वेळ आलेल्या तरुणांच्या कथा आणि व्यथा ऐकताना अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. मद्यपी व्यक्ती बेजाबदारपणे वागतात. कौटुंबिक, सामाजिक पत गमावून बसतात. आर्थिक स्थिती ढासळत गेल्याने मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या भविष्यावरही वाईट परिणाम होतो. व्यसनाच्या या विळख्यामधून स्वत: बाहेर येण्यासाठी तसेच इतरांनाही बाहेर खेचण्यासाठी अल्कोहोलिक अॅनॉनिमसचे विविध उपक्रम सुरु असतात.
दारुचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेली कोणतीही व्यक्ती सभासद होऊ शकते. विशेष म्हणजे सर्व सदस्यांची ओळख मात्र गुप्त ठेवली जाते. सभासदांच्या वर्गणीमधून सर्व उपक्रम चालतात. बाहेरची कोणतीही देणगी स्विकारली जात नाही. त्यामुळे स्वत:च्या सुधारणेची मोहिम स्वत:च राबवणारी ही संस्था आज अनेकांचे संसार वाचवायला मदतशीर ठरली आहे. आठवड्यातील सातही वार शहराच्या ७६ विविध ठिकाणांवर अल्कोहोलिक अॅनॉनिमसचे सदस्य भेटतात. एकमेकांचे अनुभव कथन करतात. शुक्रवार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतनमध्येही आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी जवळपास ५० ते ६० सदस्य एकमेकांना भेटतात. शाळेतील एका वर्गामध्ये बसून अनुभवांची देवाणघेवाण करतात. सर्वजण एकमेकांची ख्याली खुशाली अत्यंत आपुलकीने जाणून घेतात.
स्वत:च्या आणि इतरांच्याही चित्त शांतीसाठी प्रार्थना केली जाते. ‘देवा...जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्विकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला लाभू दे! केवळ परमेश्वर... अशी ही प्रार्थना सर्वजण हात जोडून अत्यंत तन्मयतेने म्हणतात. दारुचे व्यसन सोडविण्यासाठी सुरु असलेली ही अनोखी मोहिम अनेक कुटुंबांना उध्वस्त होण्यापासून वाचवित आहे. आपल्या व्यसनमुक्तीचा ‘मुक्तानंद’ अनेकांच्या आयुष्यात नव्याने जगण्याची उमेद निर्माण करीत आहे.
https://www.dailymotion.com/video/x8452j3