ऑनलाइन लोकमत/राम देशपांडेअकोला, दि. 28 - सर्वांच्या लाडक्या सांताक्लॉजने बुधवारी सकाळी अकोला रेल्वे स्थानकावर स्वच्छ रेल, स्वच्छ भारतचा संदेश दिला. दक्षिण मध्य रेल्वे व होली क्रॉस कॉन्व्हेंटच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून प्रवासी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. भारतीय रेल्वे प्रशासनाने स्वच्छ रेल, स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जातो. दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीनेसुद्धा अकोला रेल्वे स्थानकावर वेळोवेळी हे स्वच्छता अभियान राबविले जाते. ज्यामध्ये शहरातील विविध सामाजिक व सेवाभावी संघटना सहभागी होऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करतात. ख्रिस्त बांधवांनी २५ डिसेंबरला नाताळ साजरा केला. सर्वांच्या आवडत्या आणि लाडक्या सांताक्लॉजने स्वच्छतेचा संदेश दिल्यास रेल्वेच्या वतीने राबवित येणारे स्वच्छ रेल, स्वच्छ भारत अभियान अधिक प्रभावी ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन, येथील होली क्रॉस कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी अकोला रेल्वे स्थानकावर स्वच्छ रेल, स्वच्छ भारत अभियान राबविले. यामध्ये सांताक्लॉज बनलेल्या विद्यार्थ्याने गीताच्या तालावल नृत्य करीत प्रवासी नागरिकांना स्वच्छतेचा महामंत्र दिला. दरम्यान, सांताक्लॉजने गाडीमध्ये बसलेल्या व फलाटावर उभ्या असलेल्या प्रवासी नागरिकांना चॉकलेट, गोळ्या-बिस्किटे वितरित केली. क्रॉस कॉन्व्हेंटने राबविलेले या स्तुत्य अभियानाला दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे संपूर्ण सहकार्य लाभले. अभिनव पद्धतीने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात होली क्रॉस कॉन्व्हेंटचे विद्यार्थी, शिक्षिका यांच्यासह दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य स्वास्थ निरीक्षक नवलकुमार, डॉक्टर जगदीश खंडेतोड, सहायक अभियंता दयाल, रेल्वे सुरक्षा अधिकारी कांबळे यांच्यासह द. मध्यचे सर्व स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते.
https://www.dailymotion.com/video/x844mq4