शिवराज यादव / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुलींच्या जन्मदरात होत असलेली घट सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. सर्वजण यासंबंधी चर्चा करताना दिसतात मात्र कृती करण्याची वेळ येत तेव्हा मात्र सर्वाचे हात बांधलेले दिसतात. नेमका हाच मुद्दा उचलण्याचा निर्णय घेत अविनाश महारनूर या तरुणाने आपल्या परिने हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं. यासाठी त्याने निवडलेला मार्गही अनोखा होता. अविनाशने चक्क महिलांप्रमाणे चापूनचोपून साडी नेसून हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं.
26 वर्षीय अविनाशचा स्वत:चा व्यवसाय असून दादरमधील नायगांव पोलीस क्वार्टर्समध्ये तो राहतो. "मला काहीतरी वेगळं करायचं होतं. काही दिवसांपुर्वी वृत्तपत्रात मुलींच्या जन्मदरात घट झाल्याची बातमी वाचली आणि हा मुद्दा आपण उचलला पाहिजे असं मला वाटलं. यानंतर माझी तयारी सुरु झाली. साध्या पद्धतीने लोकांना सांगितल्यास ते लक्ष देणार नाहीत याची मला कल्पना होती. म्हणून मग मी साडी नेसून मुलगी वाचवा संदेश देत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचता यावं यासाठी मी मध्य रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला", असं अविनाश सांगतो.
ट्रेनमध्ये साडी नेसून प्रवास करणं तसं अविनाशसाठी सोपं नव्हतं. आधीच मध्य रेल्वेला असणारी गर्दी आणि त्यात साडी नेसली असल्याने अविनाशला ट्रेनमध्ये चढायलाही मिळत नव्हतं. गर्दीमुळे त्याला दोन ट्रेन तर अशाच सोडून द्याव्या लागल्या. एकट्याने प्रवास करत हे सर्व करणं शक्य नसल्याने अविनाशने आपला मित्र शिवरायलाही सोबत घेतलं होतं. दोघांनी दादरपासून ते ठाण्यापर्यंत शक्य तितक्या स्थानकांवर थांबून डबे बदलत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
https://www.dailymotion.com/video/x844wij
नेमका अनुभव कसा होता असं विचारला असता अविनाशने सांगितलं की, "ट्रेनमध्ये मी बोलत असताना अनेकजण दुर्लक्ष करत होते, पण काहीजणांनी माझ्या या कामाचं कौतुक केलं. अनेकांनी हात मिळवून मस्त काम करतोयस अशी शाबासकीही दिली. कित्येक मुलींनीदेखील माझी भेट घेऊन छान काम करताय अशी पावती दिली".
"माझ्यासाठी हा पहिलाच पण खूप काही शिकवणारा अनुभव होता. माझ्या या कामामुळे एका व्यक्तीने जरी शिकवण घेतली तरी मला आनंद होईल. माझं काम पाहून इतर लोकांनीही प्रेरणा घेऊन आपापल्या परिने हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा, अशी आशा अविनाशने व्यक्त केली आहे.