ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. २१ : मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात अख्खी तळलेली पाल आढल्याचा धोकादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. सिलबंद चिवड्यात विषारी प्राणी आढल्यामुळे अमरावतीचे अन्न औषधी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विजयनगर येथील विमल चुडे या महिलेने देशपांडेवाडीतील 'गणेश डेअरी' या दुकानातून मनभरीच्या चिवड्याचे पाकिट खरेदी केले. 'मनभरी नमकिन तिखा मिठा मिक्चर' असे या पाकिटावर लिहिलेले आहे. ४०० ग्रॅम वजनाचे हे पाकिट खरेदी केल्यानंतर विमलबाई यांनी वाटीत थोडा चिवडा खाण्यासाठी काढला. चमच्याने दोन घास त्यांनी खाल्ले. तिसरा घास घेतनाना पालच वाटीत दिसली. त्यानंतर त्यांना दोनवेळा उलट्या झाल्या.
चिवड्याच्या सिलबंद पाकिटात आढळलेली पाल विमलबार्इंनी निरखून पाहिली त्यावेळी ती अखंड होती, फ्राय झालेली होती. विमलबार्इंनी पाल चिवड्यात टाकून ते अख्खे पाकिट गणेश दूध डेअरीत नेले. त्यांनी चिवड्याचे पाकिट ठेवून घेतेल. नागरिकांनीे दुकानदाराला खडसावल्यावर पाकिट विमलबार्इंना परत करण्यात आले. विमलबाई त्या पाकिटासह लोकमत कार्यालयात आल्या. बोटभर लांबीची पाल त्या पाकिटात होती. यासंबंधाने मनभरीशी संपर्क होवू शकला नाही. अशी पाल पोटात गेल्याने हगवण लागणे, रक्तचाप कमी होणे, उलट्या होणे, विषबाधा होणे, असे प्रकार होवू शकतात. अतिसार, विषबाधा झाल्याने प्रकृती धोक्यात येवू शकते, अशी प्रतिक्रिया डॉ. मनोज निचत यांनी दिली.