ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. १८ - जलप्रदूषणात भर टाकणाऱ्या पर्यावरणास हानिकारक अशा प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बनवू नयेत, असे निर्देश सहा वर्षांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने देऊनही बाजारात पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल होत आहेत. बक्कळ कमाई करून देणाऱ्या पीओपीच्या मूर्ती बाजारात आणल्या जात असताना गेल्या ८२ वर्षांपासून ‘शाडू एके शाडू’ हाच ध्यास घेत शाडू मातीकामातून गणेशमूर्ती घडविण्याचा वसा नाशिकमधील सिडकोतील मोरे कुटुंबीय जोपासत आले आहे. मोरे कुटुंबीयांच्या इको फ्रेंडली गणेशमूर्तीची कीर्ती सातासमुद्रापल्याड जाऊन पोहोचली असून, यंदा कॅनडा, इंग्लंडमधील मॅँचेस्टर याठिकाणी शाडूमातीतील बाप्पा जाऊन पोहोचले आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या साचेबद्ध गणेशमूर्ती, त्यांना लावण्यात येणारे रासायनिक रंग यामुळे जलप्रदूषणात वाढ होत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांकडून ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा करण्याची चळवळ सुरू आहे. काहीअंशी या चळवळीला यश येत असले तरी अजूनही बाजारात स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या पीओपीच्या गणेशमूर्तींनाच ग्राहकांकडून मागणी असते. पीओपीच्या मूर्ती बाजारातच न आणण्याचा न्यायालयाचा आदेश असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. पूर्वी नाशकात हाताने तयार केलेल्या गणेशमूर्तींना मागणी असायची. मात्र आता बाहेरून आयात होणाऱ्या मूर्तींचा खप वाढत चालला आहे. अशा बाजारू जमान्यात नाशिकमधील सिडको परिसरातील गणेश चौकात राहणारे मूर्तिकार शांताराम मोरे व त्यांची तीनही मुले मयूर, गणेश आणि ओंकार यांनी शाडूच्या मातीपासूनच गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. १९३४ मध्ये हरिभाऊ मोरे यांनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती घडविण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांचा मूर्तीकलेचा वारसा त्यांचे सुपुत्र शंकरराव मोरे यांनी चालविला. त्यानंतर मोरे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीने म्हणजेच शांताराम मोरे यांनी इको फे्रंडली गणेशमूर्तीची परंपरा पुढे चालू ठेवली. आता मोरे कुटुंबीयांची चौथी पिढी या मूर्तीकलेला आधुनिकतेचा साज चढवित शाडूमातीच्या मूर्तीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम करत आहे. बख्खळ कमाई करून देणाऱ्या पीओपीने मोरे कुटुंबीयांना आजवर मोहात टाकलेले नाही. केवळ शाडूच्या मातीपासूनच मूर्ती घडविण्याची एक चळवळच मोरे कुटुंबीय राबवत आहेत. मोरे कुटुंबीयांचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना अपेक्षित अशी मूर्ती घडवून देण्याचे काम केले जाते. शिवाय, मूर्ती घडविताना सोवळे-ओवळेही पाळले जाते. त्यामुळे मूर्तीची पवित्रता राहून ग्राहकांनाही मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे आत्मिक समाधान लाभते. गेल्या आठ वर्षांपासून मोरे यांच्याकडून परदेशातही शाडूमातीच्या मूर्ती पाठविण्यात येत आहेत. मोरे कुटुंबीय दरवर्षी सुमारे ४०० ते ४५० मूर्ती घडवितात. वेगवेगळ्या प्रकारांत मूर्ती घडविताना शास्त्रशुद्ध बारकाव्यांचीही तितकीच काळजी घेतली जाते. त्यामुळे मोरे कुटुंबीयांकडे दरवर्षी ग्राहकांची प्रतीक्षा यादी पाहायला मिळते.
नागरिकांनीच शाडू मूर्तीचा धरावा आग्रहशाडूमातीच्या गणपतीबाबत ग्राहकांमध्ये काही गैरसमज आहेत. परंतु शाडूमातीची मूर्ती घडविल्यानंतर ती टणक बनते. मूर्तीवर पाण्याचे थेंब पडले तरी ती विरघळत नाही. शाडूमातीच्या मूर्तीमध्ये कलाकुसरीत वैविध्यता आणता येते. याउलट पीओपीच्या मूर्ती या साचेबद्ध असतात. गेल्या चार पिढ्यांपासून आम्ही केवळ शाडूमातीच्याच मूर्ती घडविण्याचे काम करत आलो आहोत. हल्ली मूर्तिकार कमी आणि नकलाकार जास्त बनले आहेत. बाहेरून कच्च्या मूर्ती आणून केवळ रंगकाम केले जाते. मुळात नागरिकांनीच शाडूमातीच्या मूर्तींचा आग्रह धरला तर पीओपीच्या मूर्तींचा मागमूसही शिल्लक राहणार नाही.- शांताराम मोरे, मूर्तिकार, नाशिक