ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २६ : सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. आज त्यांचा जन्मदिवस. २६ जून १८७४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मदिन साजरा करण्यासाठी कोल्हापूरवासीय तयार आहेत, त्याची जय्यत तयारी केली गेली आहे. शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते. त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.
शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर शाहू महाराज असे नामकरण झाले. शाहूं महाराजांनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली.
छत्रपती शाहूमहाराजांच्या जन्मदिनाचा उस्ताह कोल्हापूरात जोरदार साजरा केला जात आहे. त्याची जोरदार तयारी केली गेली आहे. त्यांच्या जन्मस्थळाला फुलांच्या हारांनी सजवले गेले आहे. त्याचे छायाचित्रण लोकमतचे अादित्य वेल्हाल यांनी केले आहे.