ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 26 - दिवाळीनिमित्त तब्बल ५१ हजार पणत्यांनी बुधवारी ऐतिहासिक शनिवारवाडा उजळून निघाला. चैतन्य हास्य योग मंडळाच्यावतीने हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा दीपोत्सव पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
चैतन्य हास्य योग मंडळाच्या वतीने दरवर्षी शनिवारवाड्यासमोर दीपोत्सव साजरा केला जातो. मागील वर्षी दुष्काळामुळे केवळ प्रतिकात्मक पणती पेटवून दीपोत्सव करण्यात येवून दुष्काळग्रस्तांना मदत देण्यात आली होती. यंदा मंडळाने शनिवारवाड्याच्या पंटागणात तब्बल ५१ हजार पणत्या वापरून दीपोत्सव उत्साही वातावरणात साजरा केला. लामण दिवा, आकाशकंदील, शुभ दिपावली अशी अक्षरे पणत्यांच्या सहाय्याने तयार करण्यात आली होती. या पणत्यांच्या तेजाने शनिवारवाडा उजळून निघाला. अभिनव कला भारतीच्या वतीने निलेश रावखंडे यांनी रांगोळीने आकार तयार केला होता. अक्षय घरटं या संस्थेतील सुमारे ४० मुला-मुलांनी रांगोळीवर पणत्या ठेवून त्या प्रज्वलित केल्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना सहकार्य केले, अशी माहिती मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष अरूण पाठक यांनी दिली.
पाहा व्हिडीओ-