मुंबई : मुंबईमध्ये काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चुकविल्याने विरोधकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी जेथे जातील त्या भुमीतील थोर व्यक्ती, देवी देवतांचे नाव घेऊन भाषणाला सुरुवात करतात. महाराष्ट्रात आले की ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यास विसरत नाहीत. मात्र, कालच्या मुंबईतील प्रचारसभेत त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव चुकवले आणि विरोधकांच्या रडारवर आले.
मुंबादेवीच्या आशिर्वादाने भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणण्याऐवजी 'छत्रपती शिवराज महाराज' असे उच्चारले. यावेळी ही चूक त्यांच्या लक्षात आली नाही. त्यांनी भाषण तसेच पुढे सुरु ठेवल्याने विरोधकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
महत्वाचे म्हणजे भाजपाचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्र्यांचे नाव शिवराज सिंह चौहाण आहे. आणि मोदी हे मध्य प्रदेशमधील सिधी आणि जबलपूर येथे दोन प्रचारसभांना संबोधित करून आले होते.