ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 25 - राज्यभरात मराठा क्रांती मूक मोर्चांचा धडाका सुरू असतानाही सरकार ठोस पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे कोपर्डीपासून शेकडो मैल दूर असलेल्या यवतमाळातही रविवारी निघालेला मराठा-कुणबी मूक क्रांती मोर्चा लक्षवेधी ठरला. जिल्ह्यातील लक्षावधी पावलांनी आज यवतमाळचे मुख्य रस्ते तुडविले. पण मोर्चेकऱ्यांच्या चालण्यात शिस्त होती अन् वागण्यात सौहार्द. मूक मोर्चातील प्रत्येक व्यक्तीची शांतता गंभीर जरुर होती, मात्र ती निगरगट्ट व्यवस्थेच्या कानठळ्याही बसवित होती.सोळा तालुक्यांच्या विस्तारित आणि शेतकरीबहुल लोकसंख्येच्या यवतमाळ जिल्ह्यात निघणाऱ्या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. रविवारी सकाळपासूनच मोर्चेकऱ्यांचे जत्थे शहरात दाखल होऊ लागले. पांढरकवडा, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंबमधून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी शांतपणे शहरात प्रवेश केला. आर्णी, नेर, पुसद, दिग्रस, महागाव, बाभूळगाव आदी तालुक्यांतील मोर्चेकऱ्यांनीही अत्यंत संयम बाळगून नियोजित रस्त्यानेच समता मैदान गाठले. शहरात येणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या वाहनांची गती फार नव्हती. कुठेही नारे नव्हते. घोषणा नव्हत्या. केवळ गाडीवर एक भगवा झेंडा फडफडत होता. बंदोबस्तातील पोलिसांना कोणत्याही मोर्चेकऱ्याशी हुज्जत घालण्याचा प्रसंग उद्भवला नाही. मात्र, शांत असले तरी मोर्चेकऱ्यांची प्रचंड संख्या शहराचे लक्ष वेधत होती. घरा-घरात मोर्चाची चर्चा सुरू झाली. यातूनच मराठा-कुणबी समाजेतर नागरिकांनीही घराबाहेर पडून आपली उत्सूकता व्यक्त केली.सकाळी १० वाजता समता मैदान ह्यफुल्लह्ण झाले. भगवे झेंडे लहरत होते. ध्वनीक्षेपकावरील प्रत्येक सूचनेचे शिस्तबद्ध पालन केले जात होते. त्याचवेळी आलेल्या पावसानेही मोर्चेकऱ्यांचे लक्ष विचलित होऊ शकले नाही. मोर्चाला सुरूवात होताच नियोजित कार्यक्रमाप्रमाणे महिला आणि तरुणींनी मोर्चाचे ह्यसारथ्यह्ण स्वीकारले. त्यांच्या पाठीशी खंबिर पावले टाकत तरुण, प्रौढ, ज्येष्ठ आणि शाळकरी मुलेसुद्धा अगदी शांततेत निघाली. मोर्चा दरम्यान धो-धो पाऊस बरसला. तरीही मोेर्चेकरी जागेवरुन हलायला तयार नव्हता. यवतमाळच्या इतिहासात एवढा मोठा मोर्चा पहिल्यांदाच निघाला.
VIDEO- यवतमाळात मूक आक्रोश
By admin | Published: September 25, 2016 8:16 PM