ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ७ - सापाचे नाव उच्चारताच प्रत्येकाच्या मनात भीतीचे काहूर माजते. परंतू बुलडाणा जिह्यातील मेहकर येथील एका सर्पमैत्रिणीने मानवी वस्तीतून आतापर्यत जवळपास ५१ हजार साप पकडून त्यांना जंगलात सुरक्षित स्थळी सोडून जीवदान दिले आहे. राज्यातील सर्वात पहिली सर्पमैत्रीण असलेल्या या महिलेचे धाडस पाहून सर्वच जण अवाक होतात.
मेहकर येथील वनिता बो-हाडे या वयाच्या बाराव्या वर्षांपासून साप संवर्धनाचे काम करतात. राज्यातील पहिली सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने सापांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे सापांशी दोस्ती करणा-या वनिताताईच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतूक होते. वनिताताई यांनी धोका पत्करून मोठमोठे विषारी सापही खेडोपाडी पकडले आहेत.
भारनियमनाच्या काळात त्यांनी खेडोपाडी जाऊन मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात मण्यार, घोणस, नाग असे विषारी साप पकडले. विशेष म्हणजे त्यांना एकदाही सर्पदंश झाला नाही. मानवी वस्तीत निघणारा साप हा विषारी असो किंवा बिनविषारी भितीपोटी लोक सापाला संपवतात. त्यामुळे पर्यावरण आणि बळीराजाचा मित्र असलेला साप नाहक मरतो.
अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या सापांना जिवनदान मिळावे यासाठी वनिताताईने हे कार्य हाती घेतले आहे. परिसरात कुठेही साप आढळला, तर लोक वनीताताई यांना फोन करून बोलावतात. त्यानंतर त्या सापाला आपल्या ताब्यात घेऊन जंगलात सोडून देतात. आतापर्यंत वनीतातार्इंनी ५१ हजार सांपाना जीवनदान दिले आहे.
सापांविषयी जनजागृतीची मोहिम
महाराजस्व अभियान २०१६ अंतर्गत मेहकर तहसिल कार्यालयामार्फत जनजागरण करण्याकरीता महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या औचित्यावर महिला सर्पमित्र वनिता बोराडे, सर्पमित्र डी.भास्कर यांच्यासह त्यांच्या सहकाºयांनी कार्यशाळा घेवून गावोगाव सापांविषयी जनजागृती करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. सर्पमित्र वनिता बोराडे यांनी मार्गदर्शन करुन सापाची भिती दूर करण्यासाठी प्रत्यक्षिकासह माहिती देत आहेत. यामध्ये त्यांनी उपस्थित महिलांना, मुलांना, पुरुषांना धामण जातीचा साप त्यांच्या जवळ पाहण्यास देतात. महाराष्ट्रात सापांच्या एकूण ५२ जाती आहेत. यासह विषारी साप, बिनविषारी सापांविषयी माहिती देतात. तसेच धामण साप बिनविषारी, उंदिर घुशीचा नाश करी, साप वाचवा पर्यावरण वाचवा, असे आवाहन उपस्थितांना डी.भास्कर यांनी केले आहे.