मुंबई - महाराष्ट्राचा शेतकरी सक्षम आणि स्वयंपूर्ण झाला पाहिजे असे स्वप्न महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी पाहिले होते. आजच्या काळात आपला शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक असून त्यासाठी शेतकऱ्याला अद्ययावत कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी, शेतकऱ्यांना आधुनिक माहिती व जागृतीसाठी राज्यात 1 ते 7 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे टीम इंडियाचा फलंदाज आणि माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं कौतुक केले आहे.
अजिंक्य रहाणेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडितोतून राज्य सरकारच्या उपक्रमाचं कौतुक करत, मीही एक शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यांच्या कष्टाची मला जाणीव असल्याचं म्हटलंय. शेतकऱ्यांबद्दल मला खूप प्रेम आणि आदर असून कोरोना महामारीच्या काळातही शेतकरी आपल्या सर्वांसाठी रात्रंदिवस मेहनत घेतोय, परिश्रम घेतोय हे आपण पाहतोय. येणारा आठवडा 1 ते 7 जुलै, आपण कृषी संजीवनी सप्ताह म्हणून साजरा करत आहोत. या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग नक्कीच सोपा होईल, अशी मला खात्री आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, असेही अजिंक्य रहाणेनं म्हटलंय. रहाणेचा हा व्हिडिओ कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काम केले. शेती, जलसंधारण क्षेत्रात त्यांनी आमूलाग्र बदल केले. नवीन बी-बियाणे, शेतीसाठी खतांची, पाण्याची उपलब्धता यासाठी काम करताना राज्य अन्नधान्यात स्वयंपूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न केले. त्यास प्रेरणा मानून राज्य सरकारने हा कृषी संजिवनी सप्ताह आयोजित केला आहे. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम कृषी संजीवनी सप्ताहाद्वारे राबवला जात आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन मंत्री संदिपन भुमरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात कृषी संजीवनी सप्ताह आयोजित करण्यात येत असून त्याचा फायदा राज्यातील सर्वदूर शेतकऱ्यांना होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.