पाथर्डी – राज्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केलं आहे. सकाळी ७ ते ११ पर्यंत भाजीपाला, किराणा दुकानं उघडण्याची परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर बंधनं आली आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियम पायदळी तुडवत सर्रासपणे दुकानं उघडी ठेवल्याचं दिसून येत आहे.
पालिका प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते. बहुतांशवेळी कर्मचाऱ्यांकडून दुजाभाव केल्याचा आरोप दुकानदार महापालिकेवर करतात. सध्या पाथर्डी शहरात एक घटना चर्चेचा विषय बनली आहे. याठिकाणी एका पालिका कर्मचाऱ्याने आपल्या आईवर कारवाई करत कर्तव्याला प्राधान्य दिल्याचं आदर्श उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे. इतकचं नाही तर आरोप करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. भावनेपेक्षा व नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे नाव रशीद शफी शेख आहे.
रस्त्यावर भाजीपाला विकण्यास मनाई असताना रशीदची आई भाजी विकण्यासाठी बसली होती. त्यावेळी नगरपालिकेच्या कारवाईवेळी रशीदने आईचा सर्व भाजीपाला उचलून घंटागाडीत टाकून कारवाई केली. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजणाऱ्या रशीदचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तहसीलदार,मुख्याधिकारी यांनी ही रशीदच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले आहे.
पालिका कर्मचा-यांची टीम सकाळी ७ ते ११ वेळेत फिरून नियम मोडणारे विक्रेते, व्यापारी, फेरीवाले आदीविरुद्ध कारवाई करते. बाजार तळावर दररोजचा भाजी बाजार भरतो येथे रस्त्याच्या लगत बेगम शफी शेख ही ज्येष्ठ महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. शहरात सर्वत्र ठिकठिकाणी दररोज भाजी विक्रेते बसतात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पालिका कर्मचाऱ्यांचे पथक बाजार तळात आले असता नियम मोडून दुकानदारी करणाऱ्यांचे शटर फटाफट बंद झाले. भाजी विक्रेत्या महिलांनीही विक्री थांबवली. त्यावेळी रशीदने स्वत:च्या आईवरही कारवाई करण्यास मागे हटला नाही.