- लक्ष्मण मोरे / ऑनलाइन लोकमत
संसारात विघ्न : कॉल रेकॉर्डरचा हेरगिरीसाठी वापर
पुणे, दि. 2 - मोबाईल हे खरं तर सुसंवादाचे साधन. परंतु, पती-पत्नीच्या नात्यांमध्ये हेरगिरी करण्यासाठी मोबाईलचा वापर होऊ लागलाय. यामुळे कौटुंबिक वादाची काही प्रकरणे अगदी घटस्फोटापर्यंत गेली आहेत. महिला सहाय्य कक्षाकडे आलेल्या एका तक्रारीच्या समुपदेशनावेळी पतीने पत्नीच्या मोबाईलमध्ये व्हाईस रेकॉर्डर अॅप डाऊनलोड करून पत्नीचे मित्राशी झालेले संभाषण ऐकले. त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला असून पतीने थेट घटस्फोट घेण्याची तयारी सुरु केली आहे.
गेल्या काही महिन्यात महिला सहाय्य कक्षाकडे ‘एक्स्ट्रा मेरेटल अफेअर्स’ अर्थात विवाहबाह्य संबंधांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर, जीमेलचे हँगआऊट यासारख्या चॅटींग अॅप्समधून उघडकीस आलेल्या अनैतिक संबंधांमधून नात्यांची वीण उसवत चालली आहे. हे कमी होते की काय त्यामध्ये आता नवनव्या अॅप्सची भर पडत चालली आहे. मोबाईल कॉल रेकॉर्डरद्वारे थेट पती पत्नी एकमेकांचे संभाषण ऐकत असल्याचे समोर आले आहे.
दोनच महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या एका तरुण दाम्पत्याच्या नात्यामध्ये अशाच कॉल रेकॉर्डर आणि व्हॉट्सअॅपमुळे दुरावा आला आहे. पतीने या पत्नीला थेट न नांदवण्याची भुमिका घेतली आहे.
घटस्फोटाच्या मागणीमुळे हादरलेल्या पत्नीने महिला सहाय्य कक्षामध्ये धाव घेत पतीविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला. पती नांदवायचे नाही म्हणत होता तर पत्नी नांदायला तयार आहे असे सांगत होती. त्यांची समजूत काढता काढता त्यांच्यातील वादाचे मुळ सहायक पोलीस आयुक्त निलीमा जाधव यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पतीने पत्नीचे तिच्या मित्रासोबत होत असलेले व्हॉट्सअॅप चॅटींग आणि कॉल रेकॉर्डर तपासल्याचे सांगितले. मित्रासोबत ‘नको तेव्हढ्या मोकळेपणाने’ बोलण्याचा नेमका अर्थ सांगा असा प्रतिप्रश्नच त्याने पोलिसांना केला. त्याने पत्नीला मोबाईल दिला होता. या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप आणि अन्य अॅप डाऊनलोड करताना त्याने कॉल रेकॉर्डरही डाऊनलोड केला होता. मात्र, मोबाईलमधील काही अॅप हाईड करुन ठेवण्यात आलेले होते. याचा पत्नीला थांगपत्ताच नसल्याने तिचे मित्रासोबतचे बोलणे या अॅपमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. पतीने हा मोबाईलच स्वत:च्या ताब्यात घेतला आहे.
पोलिसांना या मोबाईलमधील चॅटींग त्याने देण्याची तयारीही दर्शवली आहे. पोलिसांनी त्याची समजूत घालत पत्नीला एक वेळ माफ करुन संसार पुढे नेण्याची विनंती केली. अशा एखाद्या घटनेने संसार मोडायचा नसतो असे सांगतानाच पत्नीलाही मित्रांशी असे बोलणे, चॅटींग करणे याची गरजच काय असे खडसावत तिलाही नीट वागण्याच्या सुचना दिल्या. दोघांची समजूत काढत एकमेकांशी बोलण्याचा आणि गैरसमज असतील तर ते दुर करण्याचा प्रयत्न करण्याच्या सुचना निलीमा जाधव यांनी दिल्या.
अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी महिला सहाय्य कक्षामध्ये दररोज येत आहेत. एकूण प्राप्त होणा-या तक्रारींपैकी मोबाईलमुळे आलेल्या वितुष्टाच्या तक्रारींचे प्रमाण जवळपास ३५ टक्के असल्याचे सहायक निरीक्षक संगिता जाधव यांनी सांगितले.