ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १९ - मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार आज अकोल्यात उमटणार असून अकोला क्रिकेट क्लब मैदानातून निघणारा मोर्चा हा विदर्भातील पहिला मोर्चा असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मोर्चात मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याची नोंद पोलीस विभागाने घेतली आहे. अकोला जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचा एल्गार विदर्भासह राज्याचे लक्ष वेधून घेणारा ठरेल, असा दावा आयोजन समितीने केला आहे.ऐनवेळी कुठे अनुचित प्रकार घडू नये, याची संपूर्ण दक्षता घेण्यात आली असून, मोर्चातील मार्गावर ५००0 स्वयंसेवकांची चमू तैनात असून यामध्ये ५०० महिला स्वयंसेवक आहेत . सोमवारी सकाळी या चमुला सूचना देण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चा हा कुठल्याही जातीच्या, धर्माच्या विरोधात नाही. आता ‘आरक्षण’ हा एकच निर्धार घेऊन मराठा एकवटला आहे. कोपर्डी येथील घटनेचा निषेध तसेच अॅट्रासिटी कायद्यात बदल हवा आहे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.