ऑनलाइन लोकमत
आकोट, दि. २२ सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खैरखेड या गावात मागील वर्षी केवळ दोन मिनिटांत एक हजार वृक्ष लावण्यात आली होती. त्यापैंकी जगलेल्या व वाढ झालेल्या वृक्षांचा जंगी वाढदिवस तब्बल अडीच क्विंटलचा केक कापून एक वर्षानंतर २० आॅक्टोबरला साजरा करण्यात आला.
निसर्गाचा समतोल साधण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीचे एक झाड असावे, या संकल्पनेतून केशवराव मेतकर यांच्या पुढाकाराने गावकºयांनी व विद्यार्थ्यांनी विविध जातींचे वृक्ष लावले. झाडे जगविण्याकरिता ड्रिपने पाणी दिले, निगा राखली. जगविलेल्या वृक्षाचा २० आॅक्टोबरला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महसूल विभागासह इतर विभागाचे अधिकारी व गणमान्य व्यक्तींनी हजेरी लावली होती. प्रारंभी वृक्षदिंडी पालखी काढण्यात आली. शाळेकरी मुलांनी हातात फलके घेऊन वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. लेजीम पथक व भजनी मंडळीची गजरात मिरवणूक काढण्यात आली. हिरव्यागार वृक्षासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी गांडूळ खताचा अडीच क्विंटलचा केक गावकºयांचे उपस्थितीत कापला. सामाजिक कार्यकर्ता केशवराव मेतकर यांनी गावकºयांच्या मदतीने ८८७ एकर एवढे शिवार असलेल्या या छोट्याशा गावात खोदतळे, बंधारे, माती नाला बांधण्यात आलेले असून, या माध्यमातून १४ कोटी लीटर पाण्याची साठवणूक क्षमता निर्माण झाली असल्याचे सांगितले. खैरखेड येथे झालेल्या वृक्षाचा वाढदिवस हा इतर गावांना प्रेरणा देणारा ठरला.